घोडगावला बस-दुचाकीमध्ये धडक; एकाच दुचाकीवर बसलेल्या तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:55 IST2025-07-15T19:54:59+5:302025-07-15T19:55:24+5:30
भीमाशंकरला होत असलेल्या प्रचंड गर्दी मुळे सध्या मंचर भीमाशंकर व राजगुरुनगर भीमाशंकर या दोन्ही रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत

घोडगावला बस-दुचाकीमध्ये धडक; एकाच दुचाकीवर बसलेल्या तिघांचा मृत्यू
घोडेगाव: भीमाशंकर मंचर रोडवरील घोडेगाव जवळील पळसटिका फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात कोळवाडी (ता. आंबेगाव) येथील दुचाकी वरील तिघांचा जागेवर मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला.
उत्तर प्रदेश चित्रकोट येथील ५० प्रवासी लक्झरी बस द्वारे भीमाशंकर कडे दर्शनासाठी निघाले होते. लक्झरी बसचा व दुचाकीचा पळसटिका फाटा येथे भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील अथर्व संदीप खमसे (वय १९) भरत वाजे (वय १९), गणेश रामभाऊ असवले (वय १९, सर्व रा. कोळवाडी घोडेगाव) यांचा मृत्यू झाला. हे तिघेजण मंचर येथे कामानिमित्त निघाले होते. यातील दोघांचा जागेवरून मृत्यू झाला तर एक जण दवाखान्यात आल्यानंतर दगावला. घटनास्थळी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. या तिघांनाही मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील कारवाईसाठी आणण्यात आले आहे.
वाहनचालकांनी दक्षता घ्यावी
भीमाशंकरला होत असलेल्या प्रचंड गर्दी मुळे सध्या मंचर भीमाशंकर व राजगुरुनगर भीमाशंकर या दोन्ही रस्त्यावर दररोज अपघात होत आहे. हा रस्ता वळणावळणाचा व चढ उताराचा असल्याने गाड्या एकमेकांना समजत नाहीत. त्यात हा रस्ता काही ठिकाणी खराब झाला असल्याने गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यासाठी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनांनी याची दक्षता घ्यावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी केले आहे.