सिंहगड परिसरात कालव्यात मुलगा वाहून गेला; चौथ्या दिवशी जनता वसाहतीत मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:06 IST2026-01-24T16:05:15+5:302026-01-24T16:06:27+5:30
२२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७:३० वाजता जनता वसाहत परिसरातील कालव्यात वाहत्या पाण्यात मुलाचा मृतदेह आढळून आला

सिंहगड परिसरात कालव्यात मुलगा वाहून गेला; चौथ्या दिवशी जनता वसाहतीत मृतदेह सापडला
पुणे : सिंहगड पोलिस ठाणे हद्दीत १९ जानेवारी रोजी प्रतीक नारायण बिराजदार (वय १४, रा.वडगाव) हा मुलगा पोहत असताना, कालव्याच्या पाण्यात वाहून गेला होता. या घटनेनंतर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात त्याची मिसिंगची नोंद करण्यात आली होती.
२२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७:३० वाजता जनता वसाहत परिसरातील कालव्यात वाहत्या पाण्यात मुलाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन फायर ब्रिगेडच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. जनता अग्निशमन केंद्रासमोर असलेल्या कालव्यात १४ वर्षीय मुलगा मृत अवस्थेत वाहून येत असल्याचे एका शाळकरी मुलीच्या निदर्शनास आले. तिने ही माहिती रात्रीच्या पाळीतील जवान सुटण्याच्या वेळी जनता अग्निशमन केंद्रात दिली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान फायरमन महेंद्र सकपाळ, श्रीकांत बंड आणि फायरमन विजय वाघमारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात उडी मारून मृतदेह कालव्यातून बाहेर काढला व सुरक्षित ठिकाणी ठेवला. यानंतर, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह पोलिस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी मृत मुलाचे चुलते शिरीष कुमार लक्ष्मणराव बिराजदार हे स्वतः उपस्थित होते. मृतदेह पोलिस यांच्या सोबत खासगी रुग्णवाहिकेद्वारे ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.