प्रवाशांना ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा

By Admin | Updated: May 29, 2014 05:17 IST2014-05-29T05:17:48+5:302014-05-29T05:17:48+5:30

जनसामान्यांसाठी...गाव तेथे रस्ता, रस्ता तेथे एसटी’, असे बिरुद मिरविणारे एसटी महामंडळ प्रवाशांकरिता स्वच्छ पाण्याची प्राथमिक सेवा देण्यात फोल ठरले आहे

'Black water' education for travelers | प्रवाशांना ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा

प्रवाशांना ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा

विरेंद्र विसाळ, पुणे - ‘जनसामान्यांसाठी...गाव तेथे रस्ता, रस्ता तेथे एसटी’, असे बिरुद मिरविणारे एसटी महामंडळ प्रवाशांकरिता स्वच्छ पाण्याची प्राथमिक सेवा देण्यात फोल ठरले आहे. स्वारगेट एसटी स्थानकामध्ये येणार्‍या प्रवाशांकरिता जुन्या विहिरीचे अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. वर्कशॉपमधील वॉशिंग सेंटरशेजारी असलेल्या डेÑनेजजवळ ही विहीर असून, त्याचे पाणी प्रवासी आणि कर्मचार्‍यांना नळाद्वारे पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था स्वारगेट एसटी स्थानकात नसल्याचे समजताच ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी पाहणी केली. एसटी कर्मचारी आणि स्थानकावरील स्टॉलधारकांच्या अडचणी जाणून घेताना ही परिस्थिती समोर आली आहे. स्थानकाच्या आतल्या बाजूला वर्कशॉप शेड आहे. तेथे वॉशिंग सेंटरही उभारण्यात आले आहे. त्याशेजारी विहीर असून, या विहिरीमधील पाणी प्रवाशांपर्यंत नळाद्वारे पोहोचविले जात आहे. विहीर लोखंडी जाळीने झाकली असली, तरी त्यामध्ये पाला-पाचोळा, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कचरा मोठ्या प्रमाणात पडला आहे. दर सहा महिन्यांनी पाण्याची चाचणी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत असले, तरी कचरा पडलेल्या तुरट चवीच्या पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विहिरीशेजारी वॉशिंग सेंटर असून, गाड्या धुतलेले अस्वच्छ पाणी जाण्यास जागा नाही. येथील डेÑनेज कायम तुंबलेले असते. त्यामुळे जमिनीमध्ये हे अस्वच्छ पाणी मुरत असून, विहिरीमध्ये पाझरत असल्याची शक्यता आहे. एसटी कँटीनसह स्थानकावर या पाण्याचे नळ आहेत. प्रवासी या परिस्थितीपासून अनभिज्ञ असल्याने पाणी पितात आणि बाटल्याही भरून घेतात. एसटी महामंडळ स्वच्छ पाण्याची सुविधा प्रवाशांना देऊ शकत नसल्याने अनेक प्रवाशांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Black water' education for travelers