भाजपची महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी; तुम्हीही तयारी करा, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:04 IST2025-08-31T14:04:23+5:302025-08-31T14:04:37+5:30
मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी आपण कष्ट घेतले. त्यांना निवडून आणले. मात्र, त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही

भाजपची महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी; तुम्हीही तयारी करा, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
पुणे: महापालिकेची प्रभाग रचना २००७ पूर्वीही अशाच प्रकारे विश्वासात न घेता केली जात होती, तरीही आपण सत्तेवर आलो. त्यामुळे महापालिकेसाठी प्रभाग रचना अशी केली, तशी केली, याचा विचार न करता, महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना व माजी नगरसेवकांना केल्या.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली आहे. रस्ते व नैसर्गिक सीमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप भाजप सोडून सर्वच पक्षांकडून केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, दोन्ही शहराध्यक्षांसह पदाधिकारी व माजी नगरसेवकांची शनिवारी व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये बैठक घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सत्तेत असतानाही भाजपने प्रभाग रचना करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही. एका प्रभागात आपलेच उमेदवार समोरासमोर येतील, अशा पद्धतीने रस्ते व नैसर्गिक सीमांचे उल्लंघन करून प्रभाग तयार करण्यात आल्याच्या तक्रारी यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या.
अशा पद्धतीने प्रभाग फोडण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचा आरोपही काहींनी केला. यावर अजित पवार म्हणाले, महायुतीमध्ये असल्याने प्रभाग रचना करताना आम्हाला विश्वासात घ्या, असे मी मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तशा सूचना शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, मोहोळ यांनी मी साहेबांशी (मुख्यमंत्र्यांशी) बोलतो, तुम्ही आपल्या पद्धतीने प्रभाग रचना करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी आपण कष्ट घेतले. त्यांना निवडून आणले. मात्र, त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही. यापूर्वी सुरेश कलमाडीही असेच करीत होते. मात्र, तरीही आपण सत्तेवर आलोच. तेच झाले आहे. भाजप महापालिकेत स्वबळावर सत्तेवर येण्याची तयारी करीत आहे. तुम्ही चार-पाच वर्षांत काय काम केले, हे मतदार पाहात नाहीत. तुम्ही दोन-तीन महिन्यांत काय काम केले, हे बघतात. त्यामुळे तुम्ही प्रभाग रचनेचा विचार न करता कामाला लागा, स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करा, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या. बैठकीला उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
वरिष्ठ पातळीवर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू
पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेसंदर्भात सूचना मांडल्या. विशेष करून, समाविष्ट ३२ गावांमध्ये ज्या प्रकारे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे, त्याची शहानिशा व्हावी. अनेक जणांनी नैसर्गिक सीमा प्रभाग रचनेत गृहीत धरली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी करण्यात आलेली रचना जवळपास कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तेथे फार तक्रारी नाहीत. मात्र, पुण्यात वेगळी परिस्थिती आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असी माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.