झाडाची फांदी अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; कर्वेनगर भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:45 IST2025-05-27T13:45:36+5:302025-05-27T13:45:45+5:30
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला

झाडाची फांदी अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; कर्वेनगर भागातील घटना
पुणे : कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. राहुल श्रीकांत जोशी (४९, रा. कर्वे नगर, एसबीआय बँकेसमोर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
जोशी हे सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून कर्वेनगरमधील समर्थ पथ परिसरातून घरी निघाले होते. जोशी हे खासगी नोकरी करत होते. अलंकार पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर झाडाची फांदी दुचाकीस्वार जोशी यांच्या अंगावर कोसळली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या जोशी यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून जवानांनी रस्ता वाहतुकीस माेकळा केला. अपघातानंतर कर्वेनगर परिसरातील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. गेल्या वर्षी बिबवेवाडी भागात झाडाची फांदी काेसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.