ट्रॅक्टर चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:41 IST2026-01-09T18:41:25+5:302026-01-09T18:41:59+5:30
ट्रॅक्टरचा धक्का लागून खाली पडल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक पायावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला

ट्रॅक्टर चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील घटना
न्हावरे : करडे (ता. शिरूर) गावच्या हद्दीत करडे-निमोणे रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागून खाली पडल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ८) दुपारी घडली.
कैलास मारुती गायकवाड (वय ५१, रा. निमोणे, ता. शिरूर) असे या अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास गायकवाड हे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करडे येथून आपल्या दुचाकीवरुन निमोणे येथे येत होते. यावेळी समोरून खासगी साखर कारखान्याला उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर भरधाव आला. त्याने गायकवाड यांच्या दुचाकीस धक्का दिला. यामुळे ते खाली पडले असता त्यांच्या दोन्ही पायांवरून ट्रॅक्टर ट्रॉलीची चाके गेली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार पवार करत आहेत.