पुण्यात मोठा आरोग्य घोटाळा..! महापालिकेच्या ४० कोटींच्या मालमत्तेवर नेमकं चाललंय काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 11:13 IST2026-05-17T11:12:41+5:302026-05-17T11:13:02+5:30
त्या रुग्णालयावर महापालिकेकडून अद्याप कारवाई नाही

पुण्यात मोठा आरोग्य घोटाळा..! महापालिकेच्या ४० कोटींच्या मालमत्तेवर नेमकं चाललंय काय ?
पुणे : महापालिकेने ४० कोटी रुपये खर्चून बाणेर येथे उभारलेली भव्य इमारत आता एका खासगी रुग्णालयासाठी कुरण ठरत आहे. या रुग्णांच्या लुटीचा पाढा खुद्द महापालिका सभागृहात वाचूनही, महापालिकेकडून अद्याप कारवाई झालेली नाही.
बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३ मध्ये महापालिकेने ४० कोटी रुपये खर्च करून २५ हजार चौरस फुटांची अद्ययावत इमारत उभारली. कोरोना काळात येथे कोट्यवधींची यंत्रसामग्रीही खरेदी करण्यात आली. मात्र, ही सर्व मालमत्ता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एका फाउंडेशनला हॉस्पिटल चालवण्यासाठी दिली. महापालिकेच्या नियमानुसार कोणतीही मालमत्ता विनाभाडे देता येत नाही, तरीही हा मेहेरबान निर्णय घेण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी २० एप्रिल रोजीच्या सभागृहात केला होता.
ज्या संस्थेला ही इमारत देण्यात आली, तिची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे साधी नोंदही नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सुविधा वापरून हे रुग्णालय चालवले जात असताना, सर्वसामान्य पुणेकर रुग्णांना मात्र तिथे अत्यल्प दरात उपचार मिळत नाहीत. इतकेच नव्हे, तर राज्य सरकारच्या लोकोपयोगी आरोग्य योजनांनाही या रुग्णालयाने केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप बालवडकर यांनी केला.
सभागृहात हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महापौरांनी आणि आयुक्तांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही आरोग्य विभागाने केवळ नोटिशीचा सोपस्कार पार पाडण्यापलीकडे काहीही केलेले नाही.
याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, बाणेर येथील महापालिकेच्या इमारतीत सुरू असलेल्या रुग्णालयास नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जाईल, त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.