भीमा नदीला पूर; दौंड-शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:14 IST2025-08-21T19:14:35+5:302025-08-21T19:14:58+5:30

हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, नानगाव आणि कानगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, या दोन्ही तालुक्यांमधील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे

Bhima river floods; Daund-Shirur talukas lose connectivity, farmers suffer huge losses | भीमा नदीला पूर; दौंड-शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

भीमा नदीला पूर; दौंड-शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

रांजणगाव सांडस/वरवंड : दौंड तालुक्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे दौंड आणि शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, नानगाव आणि कानगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, या दोन्ही तालुक्यांमधील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला, डिंभे, चासकमान आणि भामा आसखेड धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुळा, मुठा आणि भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, खेड, शिरूर, हवेली आणि दौंड तालुक्यातील तब्बल १८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

रांजणगाव सांडस बेट परिसरात मुळा, मुठा आणि भीमा नदीचा संगम होतो. या ठिकाणी वाळकी-देलवडीला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, संगम परिसरात मुळा-मुठा नदीचे पाणी पारगावच्या बाजूकडील शेतांमधून राहू-पारगाव रस्त्यालगत पोहोचले आहे.

वडगाव रासाई, नानगाव आणि दौंड यांचा संपर्कही पुरामुळे तुटला आहे. नानगाव (ता. दौंड) येथील पूल पाण्याखाली गेला आहे. नानगाव, पिंपळगाव, हातवळण, वाळकी, रांजणगाव सांडस बेट, शितोळे वस्ती आणि राक्षेवाडी परिसरात भीमा आणि मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत.

शेतकऱ्यांना पुराची माहिती असल्याने अनेकांनी वीज पंप खोलून सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. मात्र, पाण्याच्या जास्त विसर्गामुळे हे पंप पाण्यात भिजले आहेत. नदीकाठच्या ऊस, मका, कडवळ, कोबी, कांदा आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. परिसरातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप, केबल, स्टार्टर, मोटर आणि पाइप वाहून गेले आहेत. शासनाने पूरग्रस्त भागातील शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Web Title: Bhima river floods; Daund-Shirur talukas lose connectivity, farmers suffer huge losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.