पोलिसांकडून मारहाण; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, भोरमध्ये रास्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:37 IST2025-11-27T15:35:35+5:302025-11-27T15:37:01+5:30
मयूर याने एका अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्याने त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले होते

पोलिसांकडून मारहाण; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, भोरमध्ये रास्ता रोको आंदोलन
भोर : मयुर खुंटे याच्या आत्महत्या प्रकरणी भोरमध्ये नातेवाईक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक, रास्तारोको करत संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन निलंबित करण्याची मागणी मयूर खुंटे याला पोलिसांनी मारहाण केल्याने बुधवारी दुपारी त्याने आत्महत्या केली. त्यानंतर सदरचा मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व नातेवाईकांनी घेतली यामुळे रात्री मृतदेह ताब्यात घेतला नाही.
रात्री गुन्हा दाखल न झाल्यामुळे सकाळी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईंकाचा नकार आणि उपजिल्हा रुग्णालयासमोरील भोर महाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार व उपविभागीय अधिकारी राजेंद्र सिंह गौड यांनी भेट देऊन सदर परिस्थितीची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करावे म्हणून मागील तीन तासापासून भोर-महाड रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळासह अनेक गाड्यांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झालेला आहे.मात्र अद्याप शवविच्छेदन झालेले नसून गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही.
मयूर याने एका अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्याने त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले होते. तो वडिलांसोबत पोलीस ठाण्यात गेला होता यावेळी त्याला मारहाण झाली असल्याचा आरोप केला आहे.