पुणे : बारामती मधून २०२९ ला मी उमेदवार असावं असं बारामतीकरांना वाटतं असून ही लोकांची इच्छा असल्याचे जय अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. आज सकाळपासून बारामतीत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. यावेळी मतदानाचा हक्क बजावून झाल्यावर जय यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जय पवार म्हणाले, लोकांची मागणी आहे की, २०२९ मध्ये बारामतीचा उमेदवार मी व्हावं. लोकांची अपेक्षा आहे की, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं लोकांची ती इच्छा आहे. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात बोलताना जय म्हणाले, अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अहवाल यायला एक वर्ष लागणार आहे. त्याचा तपास लवकरात लवकर करावा त्याची मागणी आम्ही वेगवेगळ्या यंत्रणेकडे करतोय. सीआयडीची टीम देखील चांगलं काम करत आहे. आमचा संपर्क त्यांच्याशी आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे ते त्यात लक्ष घालतील. अपघाता संदर्भात जोपर्यंत खरी माहिती मिळत नाही. तोपर्यंत घातपात की अपघात हे स्पष्ट होणार नाही. मी लोकांची दिशाभूल करणार नाही. आपण तोपर्यंत थांबूया जोपर्यंत कारवाई होत नाही. सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत.
दरम्यान आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खासदार पार्थ अजित पवार आणि जय अजित पवार यांनी याच ठिकाणी मतदान करत लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब मतदान केले. दादांना जाऊन ३ महिने सुद्धा झाले नाहीत. आज आम्ही कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहोत. दादांना आदरांजली वाहण्यासाठी आज मतदानासाठी यावं मोठ्या संख्येने लोकांनी मतदान करावं असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.