रस्ते पाहून पुणेकरांचे डोळेच दीपलेत! अशीच दरवर्षी सायकल स्पर्धा घ्यावी म्हणतायत...; इतरवेळी का चकचकीत दिसत नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:15 IST2026-01-23T15:15:00+5:302026-01-23T15:15:29+5:30
Bajaj Grand Tour Pune 2026 Road work : पुण्यात 'ग्रँड टूर'चा चमत्कार! रातोरात रस्ते चकाचक, पुणेकर सुखावले; "दरवर्षी अशीच स्पर्धा घ्या" म्हणत पालिकेला लगावला टोला

रस्ते पाहून पुणेकरांचे डोळेच दीपलेत! अशीच दरवर्षी सायकल स्पर्धा घ्यावी म्हणतायत...; इतरवेळी का चकचकीत दिसत नाही...
- हेमंत बावकर
पुणे: पुण्यातील खड्डेमय रस्ते आणि उंचसखल ड्रेनेजची झाकणे यांमुळे कंबरदुखीने हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या काही दिवसांपासून मोठा सुखद धक्का बसला आहे. निमित्त आहे 'बजाज ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे! या स्पर्धेसाठी महापालिकेने जे 'तंत्रज्ञान' वापरून रस्ते गुळगुळीत केले आहेत, ते पाहून पुणेकरांचे डोळे दिपले आहेत. "जर एका स्पर्धेसाठी रस्ते रातोरात चकाचक होऊ शकतात, तर मग इतर वेळी का नाही?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
पुणे महापालिकेने विकास कसा होत नाही, हे ग्रँड टूर स्पर्धेच्या निमित्ताने दाखवून दिले आहे. खरेतर सुरुवात दोन-तीन महिन्यांपूर्वीच झाली होती. ड्रेनेजचे झाकण रस्त्यावरच असतात, त्याला आजुबाजुने उंचसखल, खड्डे असतात. त्यातून गेली अनेकवर्षे पुणेकर जात होते. तरी पालिकेला आणि कंत्राटदारांना या पुणेकरांची काहीच पडलेली नव्हती. परंतू, ग्रँड सायकल स्पर्धेची तयारी सुरु झाली आणि कुठूनतरी महापालिकेच्या हाती असे तंत्रज्ञान लागले की या ड्रेनेज होलची लेव्हल आणि रस्त्याची लेव्हल एकदम तुळतुळीत झाली. खड्ड्यांतून गाड्या घालणाऱ्या, डांबराचे पॅच मारून रस्त्यापेक्षा जास्त उंचसखल झालेल्या या भागातून कंबरेला मार देत जाणाऱ्या पुणेकरांना पहिला दिलासा मिळाला तो इथेच.
यानंतर गेल्या आठवड्यापासून ही स्पर्धा ज्या रस्त्यांवरून जाणार आहे, तेथील रस्ते डांबरी होऊ लागले. रातोरात रस्त्यांवर मस्तपैकी काळी चादर पसरू लागली. सायंकाळी दमून थकून घरी गेलेला पुणेकर सकाळी कामाला परततो तोच अचानक काळे कुळकुळीत रस्ते दिसू लागले. एकदम स्मूथ. एवढे की बजाजच्या इलेक्ट्रीक चेतकचे सस्पेंशनही एकनंबर वाटू लागले आहे. सिग्नलवर कधी नव्हे ते झेब्रा क्रॉसिंगही दिसू लागले आहे. रस्त्याच्या मधले पट्टे देखील आता दिसू लागले आहेत. नाहीतर इतरवेळी पुणेकरांनी मध्यभाग समजूनच गाड्या चालवाव्यात असा समज होता. सिग्नलवर देखील पट्टे नसल्याने थोडे मागेच थांबावे असा प्रघात होता. तो आता नवे पट्टे पुसट होईपर्यंत थोडा बाजुला ठेवावा लागणार आहे.
असं वाटतंय दर 6 महिन्यातुन एकदा पुणे, पिंपरी चिंचवडला अशी आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा आयोजित व्हावी ✨😍
— 𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁 (@hypernationalst) January 21, 2026
काय ते रस्ते 🛣️
काय ती झाडं 🌱🌷🍁
काय ते वाहतूक नियोजन 👌#punerisingwithdevabhaupic.twitter.com/poPvhaE15g
नेटकरी काय म्हणतायत...
सुरुवातीला रस्ते बंद करत असल्याने पहिल्याच दिवशी पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतू, नंतर जेव्हा या स्पर्धेचा खरा फायदा समजला तेव्हा सोशल मीडियावर वेगळेच सूर उमटू लागले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर ठरवले तर काहीही होऊ शकते, एका रात्रीत रस्ते आणि डिव्हायडरची रंगरंगोटी कसे चकाचक केले गेले आहेत. पुणे महापालिकेने मनावर घेतले तर या रस्त्यांना जोडणारे इतरही जोडरस्ते आणि शहरातील उर्वरित रस्ते देखील याच पद्धतीने चकचकीत केले जाऊ शकतात, असे नेटकऱ्यांचे म्हणणे पडले आहे. काही पुणेकरांनी तर अशी स्पर्धा दरवर्षी घ्यावी, परदेशी सायकलपटूंनी दरवर्षी यावे असे साकडेच घातले आहेत. एकंदरीतच पुण्यात उत्सवाचे वातावरण पहायला मिळत आहे.
कसले भारी रोड बनवलेत पुणे शहरात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा निमित्ताने....
— Manoj Rane (@wordsMahfil) January 22, 2026
अक्षरशः युरोपियन शहरांसारखे.. pic.twitter.com/gmnCD8akLI