किरण शिंदे, पुणे: बनावट कागदपत्र तयार करून वाघोलीतील १० एकर जमिन बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आनंद लालासाहेब भगत (रा. वाघोली) याला अटक केली असून, शैलेश सदाशिव ठोंबरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावरसिद्ध लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा उर्फ अर्चना पटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या पकरणी अधिक माहिती अशी की, २०२३ मध्ये आनंद भगत याच्या तक्रारीवरून भादंवि कलम ४१९, ४६८, ४७१ आणि १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी राजेंद्र लांडगे हे चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर या करत होत्या. त्यावर 'ब वर्ग समरी' करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, मात्र नंतर न्यायालयाने याची सुनावणी बंद केली.
नंतरच्या तपासात हा गुन्हा खोट्या तक्रारीवर आधारित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भगत यांच्या घराची झडती घेण्यात आली आणि जमिनीशी संबंधित बनावट कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. त्यावरून पुढील तपास करून भगत याचा पुरवणी जबाब घेण्यात आला.
तपासादरम्यान, भगत याने ज्या महिलेकडून जमीन खरेदी केली, ती महिला जागेची खरी मालक नव्हती. तिच्या ऐवजी दुसऱ्या महिलेला बनावट मालकीहक्क मिळवण्यासाठी वापरण्यात आले. या महिलांपैकी एक अर्चना पटेकर (खरे नाव लपवून ‘अपर्णा वर्मा’) ही सांगली जिल्ह्यातील असून, दुसरी महिला अहमदनगर जिल्ह्यातील आहे. दोघींना ‘अपर्णा वर्मा’ म्हणून उभे करून जमीन हस्तांतरणाची नोंदणी करण्यात आली.
या प्रकरणात राजेंद्र लांडगे आणि शैलेश ठोंबरे यांनी संबंधित महिलेकडून साडेचार कोटी रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. शिवाय भगत व अपर्णा वर्मा यांच्यात दुबईमध्ये दोन कोटींचा ‘समजूतीचा करार’ झाला असून, त्यातील ५० लाख रुपये प्रत्यक्षात देण्यात आले. उर्वरित दीड कोटी रुपये शैलेश ठोंबरे याने भगतच्या परस्पर स्वतःच्या खात्यात जमा करून घेतल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अद्याप इतर आरोपींचा शोध घेणे सुरू असून, लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता आहे.