तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुर तालुक्यात दाखल;शुक्रवारचा मुक्काम सणसरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:33 IST2025-06-27T20:30:05+5:302025-06-27T20:33:11+5:30
संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी इंदापुर तालुक्यात प्रवेश केला. तालुक्यात सणसर गावात पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला. काटेवाडीतून प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचे भवानीनगर येथे आगमन झाले.

तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुर तालुक्यात दाखल;शुक्रवारचा मुक्काम सणसरमध्ये
सणसर : संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी इंदापुर तालुक्यात प्रवेश केला. तालुक्यात सणसर गावात पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला. काटेवाडीतून प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचे भवानीनगर येथे आगमन झाले.
यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार जीवन बनसोडे, बाळासाहेब कोळेकर, रामचंद्र निंबाळकर, अनिल काटे, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, डॉ. योगेश पाटील, बाळासाहेब पाटील, ॲड. रणजीत निंबाळकर, निलेश टिळेकर, प्रशांत दराडे, संतोष मासाळ, विठ्ठल शिंगाडे, अजित नरुटे, सणसरचे सरपंच यशवंत पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह सणसरकांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपात पालखी भाविकांच्या दर्शनासाठी विसावली. त्यानंतर सोहळा सणसरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
पालखीच्या तळावर यंदा शासनाने जर्मन तंत्रज्ञानावर आधारित भव्य असे दोन मंडप उभारले आहेत. पालखीच्या इमारतीतील स्टेजवर फुलांनी सजावट आकर्षण ठरले. पालखी सोहळ्यातील आरतीचा मान गावच्या सरंपचाना असतो. मात्र, सणसरचे सरपंच यशवंत पाटील यांनी मात्र यावर्षी हा पायंडा बदलला. पाटील यांच्या संकल्पनेतून दहावीमध्ये उत्तीर्ण होऊन पहिल्या तीन नंबर मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. यावेळी भवानीनगर येथे डाॅ. राकेश मेहता, डाॅ. शीतल मेहता यांनी यशश्री हाॅस्पिटलच्या वतीने वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी केली. तसेच अन्नदानाचा उपक्रम राबविला. आझाद तरुण मंडळाच्या वतीने चहावाटप करण्यात आले.