"भारतात आहोत की इंग्लंडमध्ये", पुण्यात इंगजी पाट्यांवरून मनसे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:12 IST2025-04-01T15:11:37+5:302025-04-01T15:12:30+5:30
वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंगजी पाट्यांमुळे मनसे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे

"भारतात आहोत की इंग्लंडमध्ये", पुण्यात इंगजी पाट्यांवरून मनसे आक्रमक
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नुकतंच पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. "महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. प्रत्येक राज्याची भाषा असते तशी महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा योग्य सन्मान होत नसेल तर कानफाटीतच बसणार", असा रोखठोक इशारा राज यांनी दिला होता. मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, असा पवित्रा घेत मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षारक्षकाच्या कानशिलात लगावली, आणि त्याला माफी मागायला लावली. त्याचे पडसाद आता पुण्यातही उमटू लागले आहेत. पुण्यात मनसेचे गणेश भोकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजी पाट्यांवरून थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. "भारतात आहोत की इंग्लंडमध्ये"? असा प्रश्न वाहतूक पोलिसांना मनसेकडून विचारण्यात येत आहे.
पुण्यातील लक्ष्मी रस्ता नुमवि शाळा परिसरात वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंगजी पाट्यांमुळे मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. इंग्रजी वाहतूक नियम पाट्यांमुळे पुण्यातही आता मोठा वाद पेटणार आहे. इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. "भारतात आहोत की इंग्लंडमध्ये"? असा प्रश्न वाहतूक पोलिसांना विचारत आता मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुण्यातील नुमवि शाळा परिसरात लक्ष्मी रोडवर स्पीड लिमिट, स्लो, स्कुल, नो पार्किंग अशा पाट्या इंग्रजीमध्ये लावण्यात आल्या आहेत. त्याबाबत मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
राज ठाकरेंनी दिलाय आदेश
आज चोहुबाजुंनी महाराष्ट्राला भोंदू, फसव्यांचा विळखा पडत आहे. मराठी लोकांना विळखा पडत आहे. इकडे मुंबईत येऊन आमच्या आस्थापनांत सांगता मराठी बोलणार नाही, कानफटीतच बसणार. उद्यापासून कामाला लागा. महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत, आस्थापनेत मराठी वापरली जाते का नाही ते बघा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत.