पुण्यात आणखी एकाने उचललं टोकाचं पाऊल; MPSC विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं, नैराश्यातून झाल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:46 IST2025-11-28T19:42:18+5:302025-11-28T19:46:56+5:30
MPSC चा अभ्यास करत असताना वाढलेल्या दडपणामुळे आणि नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

पुण्यात आणखी एकाने उचललं टोकाचं पाऊल; MPSC विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं, नैराश्यातून झाल्याची चर्चा
पुणे : पुणे शहरात आज पुन्हा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने स्वतःचे जीवन संपवले. शुक्रवारी सकाळी सुमारे ही घटना उघडकीस आली. सागर पवार (वय 26) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पुण्यात राहत MPSC परीक्षेची तयारी करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेईंग गेस्ट पद्धतीने राहत होता. आज पहाटेच्या सुमारास तो त्याच्या राहत्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी घाव घेतली. आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात सागरने MPSC चा अभ्यास करत असताना वाढलेल्या दडपणामुळे आणि नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही, त्यामुळे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान पुण्यात काल एका विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली होती. ती होऊन २४ तास झाले नाहीत. तर आज पहाटे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. तरुण - तरुणी आता कोणत्याही कारणावरून थेट आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. त्यांनी जवळच्या व्यक्तींशी बोलणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.