सरपंचांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:11 IST2025-11-21T18:10:46+5:302025-11-21T18:11:03+5:30
लोकप्रतिनिधींवरच अवैध दारू व्यावसायिकांकडून हल्ल्याचे प्रकार वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

सरपंचांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी
नीरा : पुरंदर तालुक्यातील जवळार्जून परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीचा हैदोस चांगलाच वाढला असून, त्याने थेट गावच्या सरपंचांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशांत रमेश राणे असे या आरोपीचे नाव असून, त्याला जेजुरी पोलिसांनी अटक करून शुक्रवारी (दि.२१) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली. त्यानंतर राणे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली.
या प्रकरणी सरपंच सोमनाथ दत्तात्रय कणसे यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत आरोपीविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, रविवारी (दि.१६) सकाळी साडेअकराच्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रशांत राणे यांनी सरपंच कणसे यांच्यावर थेट हल्ला चढवला. अवैध दारू विक्रीचा धंदा बंद पाडल्याचा राग मनात धरून राणे यांनी बेकायदेशीर पिस्तुल दाखवून सरपंचांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर काही साक्षीदारांसमक्ष दोन लाख रुपयांची मागणीही केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर सरपंच कणसे यांनी सोमवारी (दि.१७) जेजुरी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश पाटील हे या गुन्ह्याचा तपास करीत, आरोपी राणे याला सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर सासवड न्यायलयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
गावातील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरच अवैध दारू व्यावसायिकांकडून हल्ल्याचे प्रकार वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंचांवर झालेल्या या धक्कादायक हल्ल्यामुळे अवैध धंद्यांना मिळणारे बळ व त्यांच्या दबावाची प्रकरणे पुन्हा एकदा समोर आली आहेत.