Pune Accident: पुणे शहरातील अपघातांचा फटका तरुणांना, मात्र ज्येष्ठांचा मृत्यूदर अधिक चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:26 IST2026-01-13T15:25:03+5:302026-01-13T15:26:34+5:30
एकूण २६६ रस्ते अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ५२ टक्के मृत्यू २० ते ४९ वयोगटातील पुरुषांचे आहेत

Pune Accident: पुणे शहरातील अपघातांचा फटका तरुणांना, मात्र ज्येष्ठांचा मृत्यूदर अधिक चिंताजनक
नितीश गोवंडे
पुणे : शहरात २०२५ साली घडलेल्या रस्ते अपघातांमधीलमृत्यू आणि गंभीर जखमींची आकडेवारी धक्कादायक वास्तव समोर आणणारी आहे. वयोगट आणि लिंगानुसार केलेल्या विश्लेषणानुसार अपघातांमध्ये तरुण आणि मध्यमवयीन नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित होत असले, तरी ज्येष्ठ नागरिकांमधील मृत्यूचे वाढते प्रमाण गंभीर चिंताजनक आहे.
गंभीर जखमींच्या एकूण ७४८ प्रकरणांपैकी तब्बल ६२ टक्के म्हणजे ४६२ जखमी हे २० ते ४९ वयोगटातील स्त्री-पुरुष आहेत. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून, कामानिमित्त प्रवास, दैनंदिन धावपळ आणि वाढती वाहनसंख्या याचा थेट परिणाम या वयोगटावर होत असल्याचे स्पष्ट होते. विशेष बाब म्हणजे २० ते ५९ वयोगटातील महिलांमध्येही गंभीर जखमी होण्याचे प्रमाण जास्त असून, काम व घरगुती जबाबदाऱ्या यासाठी होणारा वाढता प्रवास याला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मात्र अपघाती मृत्यूंच्या आकडेवारीकडे पाहिल्यास वेगळेच चित्र दिसते. एकूण २६६ रस्ते अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ५२ टक्के मृत्यू २० ते ४९ वयोगटातील पुरुषांचे आहेत. त्यामुळे तरुण व मध्यमवयीन पुरुष हा सर्वांत असुरक्षित गट ठरत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांमधील मृत्यूदर विशेष चिंतेचा विषय ठरला आहे. ६० वर्षे व त्यावरील महिलांमध्ये एकूण महिला अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ३४ टक्के मृत्यू नोंदवले गेले आहेत. वयामुळे प्रतिक्रिया क्षमता कमी होणे, रस्ते ओलांडण्यातील अडचणी, अपुरे फुटपाथ, अयोग्य सिग्नल व्यवस्था आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे ज्येष्ठ नागरिक अपघातांना बळी पडत असल्याचे चित्र आहे. आकडेवारीतील आणखी एक गंभीर बाब म्हणजे गंभीर जखमींपैकी १० टक्के आणि मृतांपैकी ८ टक्के नागरिकांचे वय अद्याप नोंदवलेले नाही, ज्यामुळे अपघातांची अचूक कारणमीमांसा व धोरण आखण्यात अडथळे येत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, तरुणांसाठी कठोर वाहतूक अंमलबजावणी व जनजागृती आवश्यक असतानाच, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित फुटपाथ, स्पष्ट पादचारी मार्ग, वेगमर्यादा नियंत्रण आणि संवेदनशील शहरी रचना तातडीने राबविणे गरजेचे आहे. अन्यथा पुण्यातील अपघातांचे वाढते सावट अधिक गडद होत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्ते अपघातांची आकडेवारी (२०२५)
- एकूण गंभीर जखमी : ७४८
- एकूण अपघाती मृत्यू : २६६
गंभीर जखमी...
०-१९ वर्षे : मर्यादित प्रमाण
२०-४९ वर्षे : ६२% (४६२ जण महिला व पुरुष) - सर्वाधिक बाधित वयोगट
वय अज्ञात : १०% (८६ जखमी)
अपघाती मृत्यू...
२०–४९ वर्षे (पुरुष) : ५२% (१३८ मृत्यू) – सर्वाधिक मृत्यू
०–१९ वर्षे : मृत्यूचे प्रमाण कमी, मात्र दुर्लक्षित करता येणार नाही
वय अज्ञात : ८% (२४ मृत्यू)
एकूण ज्येष्ठ व्यक्ती जखमी : १२२
पुरुष
६०-६९ वर्षे : ४५
७०-७९ वर्षे : २३
८०-८९ वर्षे : १२
- एकूण पुरुष जखमी : ८०
महिला
६०-६९ वर्षे : २७
७०-७९ वर्षे : ११
८०-८९ वर्षे : ४
एकूण महिला जखमी : ४२
ज्येष्ठांचा अपघाती मृत्यू - ४१
पुरुष
६०-६९ वर्षे : १२
७०-७९ वर्षे : ७
८०-८९ वर्षे : २
एकूण पुरुष मृत्यू : २१
महिला
६०-६९ वर्षे : १०
७०-७९ वर्षे : ८
८०-८९ वर्षे : २
एकूण महिला मृत्यू : २०