पुणे: खडकवासला धरणाच्या नवीन उजवा मुठा कालव्यास मुंढवा भागातील शिंदे वस्तीत (किलोमीटर २२) अचानक भगदाड पडल्यामुळे सुमारे २ कोटी लिटर पाणी (२० एमएलडी) वाया गेले. भगदाड कशामुळे पडले, याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. यामुळे उन्हाळी आवर्तनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भगदाड भरण्यासाठी किमान चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच ‘जलसंपदा’च्या खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खडकवासला धरणातून कालव्यावाटे वाहणारे पाणी बंद केले. कालवा सकाळी सहा वाजण्याच्या आसपास फुटला असून, त्यामधील पाणी कमी होण्यास दुपारचा एक वाजला. भगदाड पडलेल्या ठिकाणचे पाणी बंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. मात्र, उशिराने पाण्याचा प्रवाह थांबला. दरम्यान, पडलेले भगदाड भरण्यासाठी किमान चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. तसेच भगदाड कशामुळे पडले. याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. भगदाड पडल्यामुळे उन्हाळी आवर्तनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
खडकवासला धरणामधून नवीन उजवा कालवा थेट इंदापूरपर्यंत असून, याची लांबी १३४ किलोमीटर आहे. शहरातून हा कालवा वाहत आहे. मागील अनेक वर्षांपासून या कालव्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून, राडारोडादेखील टाकण्यात येत असल्यामुळे या कालव्याची खोली कमी झाली आहे. . दरम्यान, या कालव्याचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले. त्यामुळे हा कालवा अत्यंत जुना झाला असून, वारंवार पाणी गळती, अतिक्रमणे, राडारोडा टाकण्यात येत असल्यामुळे कालवा फुटण्याच्या घटना घडत आहेत.
शिंदे वस्ती येथे नवीन उजवा मुठा कालव्याचे मोठे भगदाड पडल्यामुळे सुमारे २० एमएलडी पाणी वाया गेले. या कालव्याचे काम पूर्ण करण्यास किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. कालवा कशामुळे फुटला, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प
Web Summary : A breach in Khadakwasla canal caused loss of 20 million liters of water. Repairs will take four days, impacting summer water supply. The cause is under investigation.
Web Summary : खडकवासला नहर में रिसाव से 2 करोड़ लीटर पानी बर्बाद हो गया। मरम्मत में चार दिन लगेंगे, जिससे गर्मियों में पानी की आपूर्ति प्रभावित होगी। कारण की जांच जारी है।