तरुणीने पाचव्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन; पुण्याच्या शनिवारवाड्याजवळील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 21:06 IST2025-11-27T21:05:12+5:302025-11-27T21:06:11+5:30
इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनीही तिला ओळखले नाही. त्यामुळे बाहेर येऊन या तरूणीने इमारतीवरून उडी मारली असावी असाही तर्क लावला जात आहे

तरुणीने पाचव्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन; पुण्याच्या शनिवारवाड्याजवळील धक्कादायक घटना
पुणे : पुण्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या शनिवार पेठेत सायंकाळी दुर्दैवी घटना घडली. शनिवार वाड्याजवळील हरिहरेश्वर नावाच्या पाच मजली रहिवासी इमारतीवरून एका तरुणीने उडी मारून आयुष्याची अखेर केली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. मयत तरुणीची ओळख अद्यापही पटली नाही. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. मयत तरुणीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष इतके आहे.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तो संपूर्ण परिसर अतिशय गजबजलेला असतो. सायंकाळच्या सुमारास या संपूर्ण परिसरात नागरिकांची वर्दळ आणि वाहतुकीची लगबग सुरूच असते. अशातच हरिहरेश्वर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून या तरुणीने अचानक उडी मारली. दरम्यान मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले असता इमारतीखाली रक्ताच्या थारोळ्यात ही तरुणी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू केली.
दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या या तरुणीची ओळख अद्यापही पटली नाही. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनीही तिला ओळखले नाही. त्यामुळे बाहेर येऊन या तरूणीने इमारतीवरून उडी मारली असावी असाही तर्क लावला जात आहे. इमारतीत कशी शिरली? ती एकटीच आली होती का? सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही हालचाल दिसते का? परिसरातील लोकांनी तिला इमारतीत येताना पाहिले का? या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.