तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू, गुरुवारी झाला २३ वा वाढदिवस; बारामतीच्या वाणेवाडी परिसरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:33 IST2025-11-24T13:33:03+5:302025-11-24T13:33:21+5:30
बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर तो रेल्वेच्या रूळावर पडला, डोक्यावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तो नेमका कोणत्या कारणाने रूळावर पडला याचा तपशील समजू शकलेला नाही.

तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू, गुरुवारी झाला २३ वा वाढदिवस; बारामतीच्या वाणेवाडी परिसरात हळहळ
सोमेश्वरनगर : वाणेवाडी (ता. बारामती) येथील सिद्धांत ज्ञानेश्वर जगताप या तेवीस वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. शनिवारी कोयना एक्स्प्रेसमधून मुंबईहून पुण्याला येत असताना बदलापूर स्थानकाजवळ अज्ञात कारणाने रेल्वेच्या रूळावर पडून त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सिद्धांत हा सोरटेवाडी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते डी. वाय. जगताप यांचा मुलगा होत. नम्र आणि मनमिळाऊ असल्याने वडिलांप्रमाणेच त्याचा लोकसंग्रह होता. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला दोन वर्षांपूर्वी मुंबईतील ज्ञानदीप सहकारी बँकेत लेखनिकपदी नोकरी मिळाली होती. सुट्टीत तो पुण्यात किंवा वाणेवाडी येथे येत असे. गावाकडे काही काम नसल्यामुळे आई-वडिलांनी त्याला या शनिवारी-रविवारी येऊ नको, तर पुढील आठवड्यात येण्याचा आग्रह केला होता. मात्र, नातेवाइकांसोबत सुट्टी घालवायची म्हणून तो आज सकाळी कोयना एक्स्प्रेसने पुण्याला येत होता. त्याच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजेच्या आसपास बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर तो रेल्वेच्या रूळावर पडला. डोक्यावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तो नेमका कोणत्या कारणाने रूळावर पडला याचा तपशील समजू शकलेला नाही. रेल्वे पोलिसांनी त्याच्या वडिलांना संपर्क केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. जगताप यांना एक विवाहित मुलगी आणि सिद्धांत हा एकमात्र मुलगा होता. सिद्धांतचा गुरुवारी २३वा वाढदिवस झाला होता.