Ajit Pawar Passed Away: हरहुन्नरी अन् शिस्तप्रिय व्यक्तिमत्व अशा अजितदादांनी तब्बल ७ वेळा भूषवलं आमदारपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:29 IST2026-01-28T11:27:16+5:302026-01-28T11:29:07+5:30
१९९५ पासून २०१९ पर्यंत सलग ७ वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत

Ajit Pawar Passed Away: हरहुन्नरी अन् शिस्तप्रिय व्यक्तिमत्व अशा अजितदादांनी तब्बल ७ वेळा भूषवलं आमदारपद
पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राचे लाडके नेते गमावल्याने नागरिकांमध्ये अत्यंत दुःखाचे वातावरण आहे. आज बारामतीत शोक व्यक्त करत नागरिकांनी बाजारपेठ बंद केली आहे. बारामतीकर सद्यस्थितीत दुःखाच्या सावटाखाली असल्याचे दिसत आहे. राजकारणातील शिस्तप्रिय असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
अजित पवारांनी पवारांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी बारामतीत तब्बल ७ वेळा आमदार पद भूषवलं आहे. १९९५ पासून २०१९ पर्यंत सलग ७ वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. १९९१ सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. १९९९ ते २००४ या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते.१९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार १९९१ साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९५ या काळात ते विधानसभा सदस्य होते. अजित पवार नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते.
त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 'देवळाली-प्रवरा' या ठिकाणी झाला. अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत. अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. त्यांच्याकडे बी. कॉम. ही पदवी आहे.