टायर फुटला अन् ट्रक पलटी; मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:26 AM2023-07-10T11:26:21+5:302023-07-10T11:26:41+5:30

मुंबई - बंगळुरू महामार्गावर ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

A tire burst and the truck overturned; Accident on Mumbai-Bangalore highway, luckily no one injured | टायर फुटला अन् ट्रक पलटी; मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

टायर फुटला अन् ट्रक पलटी; मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

googlenewsNext

धायरी: मुंबई - बंगळुरू महामार्गावर कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. व ट्रक दुभाजक तोडून रस्त्याच्या पलीकडच्या दिशेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने ह्यात कोणीही जखमी झाले नाही. हि घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार घटनास्थळी पोहचले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा दिशेकडून मुंबई दिशेने कोळसा घेऊन निघालेला ट्रक नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ आला असता अचानक ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर असणाऱ्या दुभाजकला धडकला. त्यामुळे ट्रक पलटी झाला. सुदैवाने ह्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील असणारा सर्व कोळसा महामार्गावर पडल्याने काही काळाकरीता वाहतूक थांबविण्यात आली होती. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अंमलदार महेंद्र राऊत, सुशांत यादव आदी अपघातस्थळी पोहचून वाहतूक सुरळीत करीत आहेत. तसेच जेसीबीने महामार्गावर पडलेला कोळसा हटविण्याचे काम सुरू असून क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव व पोलीस अंमलदार अपघातस्थळी पोहचून अपघाताची माहिती घेत आहेत. 

ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी...

नवले पुल व भूमकर पुल परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. हा परिसर ब्लॅक स्पॉट असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामूळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नऱ्हेगावचे माजी उपसरपंच सागर भूमकर यांनी केली आहे.

Web Title: A tire burst and the truck overturned; Accident on Mumbai-Bangalore highway, luckily no one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.