भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:35 IST2025-10-13T13:34:59+5:302025-10-13T13:35:09+5:30
चोरटे दुकानात घुसल्यावर काही कामगार जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना पकडले त्यांचे हातपाय बांधून बेदम मारहाण केली.

भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी
पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. भंगाराच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याला दुकानमालक आणि कामगारांनी पकडून रात्रभर बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मृत चोरट्याचं नाव नवाज इम्तियाज खान (वय २६) असं आहे. ही घटना रात्री तीनच्या सुमारास चंदननगर परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, तिघे चोरटे चोरीसाठी एका भंगाराच्या दुकानात शिरले होते. मात्र त्यावेळी दुकानातील काही कामगार जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना पकडलं. संतापलेल्या कामगारांनी चोरट्यांचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण केली.
या मारहाणीत नवाज खान या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चोरट्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृत नवाज खानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी दुकान मालक आणि संबंधित काही कामगारांना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, चोरीचा प्रयत्न करताना चोरट्यांना रंगेहात पकडल्याने कामगारांनी आत्मरक्षण आणि संतापाच्या भरात मारहाण केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.