SET Exam: ९० हजारपैकी ६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण; सेट परीक्षेचा निकाल केवळ ७ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:59 IST2025-08-31T14:59:00+5:302025-08-31T14:59:29+5:30
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ, वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्याची पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा घेण्यात येते

SET Exam: ९० हजारपैकी ६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण; सेट परीक्षेचा निकाल केवळ ७ टक्के
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल केवळ ६.६९ टक्के लागला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता १८ शहरांमधील २५६ महाविद्यालयांत दि. १५ जून २०२५ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेसाठी एकूण १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. प्रत्यक्षात ९० हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील केवळ ६ हजार ०५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाचा टक्का अवघा ६.६९ टक्के आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ, वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्याची पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा घेण्यात येते. याप्रमाणे सेट विभागामार्फत १५ जून रोजी ४० व्या सेट परीक्षेचे आयोजन केले होते.
निकाल पाहा अन् प्रमाणपत्र डाऊनलोड करा
सेट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्रे डाऊनलोड करून घेता येतील, असे सेट विभागाने स्पष्ट केले आहे.