शस्त्राचा धाक दाखवून ५ दरोडेखोरांनी ५२ लाखांचे दागिने चोरले; सराफी दुकानावर भरदिवसा दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:38 IST2026-01-05T11:38:19+5:302026-01-05T11:38:19+5:30
आरडाओरडा केला तर जीव घेऊ, अशी धमकी देत दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सोन्याचे दागिने, वस्तू पिशव्यांमध्ये भरले आणि ते दुचाकीवरून पळून गेले.

शस्त्राचा धाक दाखवून ५ दरोडेखोरांनी ५२ लाखांचे दागिने चोरले; सराफी दुकानावर भरदिवसा दरोडा
पुणे: पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथील सराफी दुकानात ५ दरोडेखोरांनी शिरून शस्त्राचा धाक दाखवून दुकानातील ५२ लाख रुपयांचे ५२८ ग्रॅम वजनाचे दागिने दरोडा टाकून लुटून नेले.
याबाबत महेंद्रसिंह सोळंकी (३७) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शेवाळवाडी येथील महावीर ज्वेलर्समध्ये शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर ज्वेलर्स या दुकानात मालक एकटेच होते. ही संधी साधून चार जण दुकानात शिरले. एक जण बाहेर थांबलेला होता. त्यांनी महेंद्रसिंह सोळंकी यांना कोयत्यांचा धाक दाखवला. आरडाओरडा केला तर जीव घेऊ, अशी धमकी दिली. दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सोन्याचे दागिने, वस्तू पिशव्यांमध्ये भरले आणि ते दुचाकीवरून पळून गेले.
दरोडेखोरांनी ५२ लाख रुपयांचे ५२८ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. या गुन्ह्याची माहिती मिळताच मांजरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात हे पाच दरोडेखोर कैद झाले असल्याचे दिसून आले. मांजरी पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.