SSC Result 2025: राज्यात काॅपी प्रकरणी ३७ केंद्र दाेषी; नऊ विभागात मिळून ९३ घटनांची नाेंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:31 IST2025-05-13T18:30:12+5:302025-05-13T18:31:16+5:30
काॅपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्यात २० ते २६ जानेवारी या काळात काॅपीमुक्त अभियान राबविण्यात आले हाेते

SSC Result 2025: राज्यात काॅपी प्रकरणी ३७ केंद्र दाेषी; नऊ विभागात मिळून ९३ घटनांची नाेंद
पुणे : राज्यात एकूण नऊ विभागामध्ये ५१३० केंद्रावर दहावीची परीक्षा पार पडली. त्यातील ३७ केंद्र काॅपी प्रकरणात दाेषी आढळली असून, या केंद्रांवर एकूण ९३ घटना घडल्याची नाेंद झाली आहे. तसेच सहा एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी मंगळवारी दिली. तसेच दाेषी केंद्रांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, काॅपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्यात २० ते २६ जानेवारी या काळात काॅपीमुक्त अभियान राबविण्यात आले हाेते. ५ हजार १३० पैकी ७०१ केंद्रांवरील सर्व कर्मचारी बदलण्यात आले हाेते. तब्बल २७१ भरारी पथके आणि प्रत्येक केंद्रावर बैठी पथके नेमवत अनुचित प्रकार घडू नये यासाठीची आवश्यक खबरदारी घेण्यात आली हाेती.
सर्व खबरदारी घेऊनही ३७ केंद्रावर अनुचित प्रकार झाल्याचे निदर्शनास आले. यात विभागनिहाय विचार करता सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर विभागात १३ केंद्रावर काॅपीच्या ३७ घटना घडल्या. त्या पाठाेपाठ नागपूर विभागात ७ केंद्रांवर २२ घटना, पुणे विभागात ७ केंद्रांवर १७ घटना, लातूर विभागात ७ केंद्रांवर १३ घटना आणि मुंबई विभागात ३ केंद्रावर ४ घटना घडल्या आहेत. काेल्हापूर, अमरावती, नाशिक आणि काेकण विभाग निरंक आहे. एफआयआर दाखल झाल्याच्या घटना पाहता नागपूर विभागात २, नाशिक २, छत्रपती संभाजीनगर १ आणि अमरावती येथील १ नाेंद दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल, तर गडचिराेली सर्वात मागे
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९९.३२ टक्के लागला असून, या जिल्ह्याने दहावीच्या निकालात राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. सर्वात कमी गडचिराेली जिल्हाचा निकाल ८२.६७ टक्के लागला आहे. यात पुणे जिल्ह्याचा निकाल ९७.२६ टक्के असून, या विभागात पुणे जिल्हा अव्वल स्थानी आहे.
निकालाची वैशिष्ट्य काय?
- एकूण ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के
- राज्यातील २३,४८९ पैकी ७,९२४ शाळा शंभर नंबरी
- मार्च २०२४ च्या तुलनेत (९५.८१) फेब्रु-मार्च २०२५ चा निकाल (९४.१०) १.७१ टक्केने कमी
- एकूण ६२ विषयांपैकी शंभर टक्के निकाल लागलेले विषय - २४
- एनसीसी, क्रीडा, स्काऊट गाईडसाठी सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी - २ लाख ४६ हजार ६०२
- निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी - ४
- एटीकेटी पात्र विद्यार्थी - ३४ हजार ३९३
- पुनर्परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी - ८६ हजार ६४१