राज्यात २३ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:24 IST2025-05-19T15:23:54+5:302025-05-19T15:24:23+5:30

विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीने पिकांना झोपविले आहे

23 districts in the state hit by unseasonal rains Crops on 23,331 hectares damaged | राज्यात २३ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

राज्यात २३ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुणे : गेल्या बारा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे २३ जिल्ह्यांमधील तब्बल २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने भाजीपाला, फळपिके तसेच उन्हाळी हंगामातील पिकांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आणखी दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या बारा दिवसांपासून अवकाळी पावसाने विविध जिल्ह्यात हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे विदर्भाला मोठा फटका बसला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना फटका बसला आहे. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीने पिकांना झोपविले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सहा ते १६ मेपर्यंत राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पिकांमध्ये केळी, आंबा, डाळिंब, पपई, चिकू तसेच कांदा, भाजीपाला, बाजरी, मका, लिंबू, संत्रा, उन्हाळी भात या पिकांचा समावेश आहे.

सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले असून, येथील अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा या चार तालुक्यांमध्ये तब्बल १० हजार ८८८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागातील कर्मचारी बांधावर पोहचले असून, याचा सविस्तर अहवाल लवकरच राज्य सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पालघर ७९६
रायगड १७

ठाणे १
नाशिक १७८७

धुळे ६४५
नंदुरबार ५३

अहिल्यानगर १४
पुणे ४८०

सोलापूर १४३
जळगाव ४३९६

जालना १६९५
परभणी १८३

नांदेड ७
बुलढाणा १८१

अमरावती १०८८८
यवतमाळ १७९

वाशिम २०३
वर्धा २३

नागपूर ४२
चंद्रपूर १०३८

भंडारा ७५
गोंदिया १४३

गडचिरोली ३४२
एकूण २३ हजार ३३१

Web Title: 23 districts in the state hit by unseasonal rains Crops on 23,331 hectares damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.