Pune: तलावात पोहताना हालचाल अचानक बंद; पुण्यातील एनडीएमध्ये १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:54 IST2025-10-24T14:54:02+5:302025-10-24T14:54:22+5:30
NDA Pune Student Death: ५० बाय २१ मीटर आकाराच्या पोहण्याच्या तलावात तरुणाची हालचाल थांबल्याचे लक्षात येताच प्रशिक्षकाने तत्काळ त्याला पाण्याबाहेर काढून हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन (CPR) दिले, परंतु प्रयत्न निष्फळ ठरले

Pune: तलावात पोहताना हालचाल अचानक बंद; पुण्यातील एनडीएमध्ये १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
शिवणे : पुण्याच्या एनडीएमध्ये १८ वर्षीय तरुणाची तलावात पोहताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य यादव (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. हा नालंदा (बिहार) येथील असून राष्ट्रीय संरक्षण अकादमीचा (NDA) पहिल्या बॅचमधील विद्यार्थी होता. काल संध्याकाळी अंदाजे चार ते पाचच्या दरम्यान प्रशिक्षण सत्रादरम्यान २१ मीटर फ्लोटिंग सराव करत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
आदित्य हा तरुण ५० बाय २१ मीटर आकाराच्या पोहण्याच्या तलावात २१ मीटर फ्लोटिंग सराव करत होता. यावेळी त्याची हालचाल अचानक बंद झाली. हे पाहून दोन्ही बाजूंना उपस्थित असणाऱ्या सुरक्षा रक्षक आणि प्रशिक्षक यांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन (CPR) दिले. परंतु तो शुद्धीवर आला नाही. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे एनडीए परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.