...म्हणून राज ठाकरेंनी केला नाही पहिल्या टप्प्यात प्रचार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 10:47 PM2019-04-09T22:47:08+5:302019-04-09T22:49:38+5:30

राज ठाकरेंनी जाणीवपूर्वक पहिल्या टप्प्यात प्रचार न केल्याची चर्चा

mns chief raj thackeray avoids election campaign in the first phase of lok sabha election | ...म्हणून राज ठाकरेंनी केला नाही पहिल्या टप्प्यात प्रचार?

...म्हणून राज ठाकरेंनी केला नाही पहिल्या टप्प्यात प्रचार?

Next

- संदीप प्रधान

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडल्यावर शुक्रवारपासून जाहीर प्रचाराकरिता घराबाहेर पडणार आहेत. नागपूरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवत असून तेथे प्रचाराला जाण्याचे राज यांनी टाळल्यामुळे ठाकरे यांचा विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असून निकालानंतर कदाचित भाजप देशाला मराठी पंतप्रधान देणार असेल तर ते आपला पाठिंबा देऊ शकतील. सध्या राजकारणातील त्यांचे असलेले गुरु शरद पवार हेही अशीच भूमिका घेऊ शकतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

राज हे केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य करीत आहेत. महाराष्ट्रात भाजपचे सर्वोच्च नेते हे अर्थातच नितीन गडकरी हे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नाना पटोले निवडणूक लढवत असून भाजपला सोडचिठ्ठी देऊन ते काँग्रेसमध्ये आले व त्यांनी गडकरी यांना आव्हान दिले. त्यामुळे राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाची संधी देऊन बघायला काय हरकत आहे, असा सूर पाडव्याच्या मेळाव्यात लावणाऱ्या राज यांनी नागपूरमधील या बहुचर्चित लढतेत काँग्रेसच्या पटोले यांच्याकरिता जाहीर सभा घेणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपल्यावर आता राज यांचा दौरा जाहीर झाला आहे. त्यामुळे हा निव्वळ योगायोग नसल्याचे बोलले जात आहे.

केंद्रात भाजपला काठावरचे बहुमत मिळाले किंवा बहुमताकरिता ओढाताण करावी लागली तर राजनाथ सिंह अथवा नितीन गडकरी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडू शकते, अशी चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांत शिवसेना आणि राजनाथ सिंह यांचे संबंध मधूर झाले आहेत. चिमूरच्या पोटनिवडणुकीपासून शिवसेना व गडकरी यांच्यात एकेकाळचे सौहार्द राहिलेले नाही. त्यामुळे गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदाकरिता पुढे आले तर शरद पवार व राज ठाकरे हे आपले वजन त्यांच्या पारड्यात टाकतील. मराठी पंतप्रधान हवा, असा मुद्दा उचलून धरत शिवसेनेची पंचाईत करतील, अशी चर्चा आहे.

शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी राज नांदेड येथे, दि. १५ एप्रिल रोजी सोलापूर येथे, दि. १६ एप्रिल रोजी इचलकरंजी, दि. १७ एप्रिल रोजी सातारा, दि. १८ एप्रिल रोजी खडकवासला तर दि. १९ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उमेदवार आहेत तर सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत. खडकवासला येथील सभा सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघाच्या परिघात होत आहे तर रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातील महाड गोरेगावमध्ये राज यांची तोफ धडाडणार आहे.

बाळासाहेबांचेच केले अनुकरण
राज यांनी नितीन गडकरी यांच्या नागपूरमध्ये जाहीर सभा घेण्याचे टाळले असेल तर येथेही आपले काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनुकरण केले आहे. यापूर्वी झालेल्या एका लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघात बाळासाहेबांची जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र अचानक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने ठाकरे त्या सभेला हजर राहिले नव्हते.

Web Title: mns chief raj thackeray avoids election campaign in the first phase of lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.