केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 03:45 PM2021-08-06T15:45:24+5:302021-08-06T15:51:21+5:30

भाजप आणि RSS ला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार असून, यातूनच नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

congress nana patole criticised pm modi over rajiv gandhi khel ratna award renamed | केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल; काँग्रेसची टीका

केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल; काँग्रेसची टीका

Next
ठळक मुद्देकेंद्रातील भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कारमोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहेPM नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय?

मुंबई: टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. (congress nana patole criticised pm modi over rajiv gandhi khel ratna award renamed)

केंद्रातील भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवावे, जनतेची मोठी मागणी”; PM मोदींना टोला

मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे 

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता, त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही त्यांचे नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे. परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान व करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठे असून, अशा पद्धतीने ते स्थान तसुभरही कमी होणार नाही, असे नाना पटोले म्हणाले. 

RBI Repo Rate जैसे थे! महागाई, तिसऱ्या लाटेसंदर्भात शक्तिकांत दास यांचे महत्त्वाचे भाष्य

नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? 

राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडीयमलासुद्धा एखाद्या महान क्रीकेटपटूचे नाव देता आले असते. परंतु  त्याचे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलेच. त्यामुळे  राजीव गांधी यांचे नाव बदलल्याने आश्चर्य वाटत नाही, ही कृत्ती भाजपा व संघाच्या द्वेषमुलक वृत्तीतून आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूद कमी करायची आणि दुसरीकडे आपले सरकार क्रीडा क्षेत्र व खेळाडूंचे किती हित जपते, हे दाखवण्यासाठी असे केविलवाणे काम करायचे, यातून क्रीडा क्षेत्राचा अथवा खेळाडूंचा कोणताच फायदा होणार नाही, असेही पटोले म्हणाले.

Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: congress nana patole criticised pm modi over rajiv gandhi khel ratna award renamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.