घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार; आळंदी येथील धक्कादायक घटना
By नारायण बडगुजर | Updated: May 13, 2026 22:56 IST2026-05-13T22:56:04+5:302026-05-13T22:56:44+5:30
दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार; आळंदी येथील धक्कादायक घटना
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : घरात घुसून जबरदस्तीने शारीरिक संबंध करून एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ तसेच चार-पाच महिन्यांपूर्वी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथे घडली आहे.
पीडित महिलेने याप्रकरणी २४ एप्रिल २०२६ रोजी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे यांच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे ७ एप्रिल रोजी पीडितेच्या घरात आले. त्यांनी पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढुन घेतले. त्यानंतर संशयितांनी पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडितेला शिवीगाळ केली. ‘हे तुझे घर आमच्या नावावर कर नाहीतर, ते घर विकून आम्हाला पैसे दे, नाहीतर आम्ही तुला असाच त्रास देत राहु, अशी धमकीही संशयितांनी दिली.
दरम्यान, या घटनेच्या चार- पाच महिन्यांपूर्वी संशयित हे पीडित महिलेच्या घरी आले होते. त्यावेळीही त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडित महिलेने खाण्यासाठी केलेल्या भाताच्या पातेल्यात संशयिताने लघुशंका केली. या घटनेच्या तिसऱ्या दिवशी संशयित पुन्हा पीडित महिलेच्या घरी गेले. त्यावेळी पीडित महिलेने घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संशयितांनी शिवीगाळ केली. तुझी सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकी दिली. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केला, असे पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.