एका दुचाकीवर तिघे; भरधाव वेगात चालवल्याने घसरून एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:27 IST2024-12-19T17:26:16+5:302024-12-19T17:27:19+5:30
भोसरीत एका दुचाकीवरून तिघे जण जात असताना वेगात गाडी चालवल्याने हा अपघात घडला आहे

एका दुचाकीवर तिघे; भरधाव वेगात चालवल्याने घसरून एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
पिंपरी : तरुणांमध्ये सहजा वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. हुल्लडबाजी करत दुचाकी अथवा चारचाकी चालवत असल्याचे दिसून आले आहे. वेगाच्या मर्यादेचे पालन न करता वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे जीवघेणे अपघात घडू लागले आहेत. अशीच एक घटना भोसरीत घडली आहे. दुचाकीवरून तिघे जण प्रवास करत असताना अपघात झाल्याने एकाला जीव गमवावा लागला आहे. तर दोघे गंभीर जखमी आहेत. मआयडीसी भोसरीच्या गवळी माथा रस्त्यावर हि घटना घडली आहे. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दोन सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १८) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
शांतीरत्न ऊर्फ माऊली अण्णासाहेब सोनवणे (१९, रा. एमआयडीसी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ओम कांबळे आणि रोहित गायकवाड हे गंभीर जखमी झाले. सावंतकुमार मल्हारी गायकवाड (३३, रा. एमायडीसी, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीरत्न सोनवणे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवली. गवळीमाथ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना त्याची दुचाकी घसरली. यामध्ये शांतीरत्न याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी ओम कांबळे आणि रोहित गायकवाड हे गंभीर जखमी झाले.