पिंपरीत चोरटे सुसाट; ऐन दिवाळीत सव्वातीन लाखांवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 18:04 IST2021-11-01T18:02:07+5:302021-11-01T18:04:44+5:30
दुचाकी, घरफोडी तसेच चोरीच्या घटनांमध्ये होतीये वाढ

पिंपरीत चोरटे सुसाट; ऐन दिवाळीत सव्वातीन लाखांवर मारला डल्ला
पिंपरी : शहरात चोरटे सुसाट आहेत. दोन दुचाकी पळवून नेत घरफोडी तसेच चोरीच्या इतर घटनांमध्ये चोरट्यांनी करून एक लाख ३६ हजारांचा ऐवज, तसेच इतर चोरीच्या घटनांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज चोरी करून नेला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी (दि. ३१) गुन्हे दाखल करण्यात आले.
दुर्गा खुशाल सदार (वय ५५, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या रुमचे लाॅक बनावट चावीन उघडून घरात प्रवेश केला. घरातून मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुमके व वेल, सोनसाखळी, सोन्याची अंगठी, रोख रक्कम, असा एक लाख ३६ हजारांचा ऐवज चोरून नेला. घरफोडीची ही घटना २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान घडली.
राहुल विजय कोंडे (वय २८, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी टाटा मोटर्स कंपनीच्या मटेरिअल गेट जवळ, भिंतीशेजारी शनिवारी (दि. ३०) दुपारी तीनच्या सुमारास पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.
अशितोष बाळू मोरडे (वय २३, रा. मोडेवाडी, मंचर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळील गावजत्रा मैदान येथील भाजीमंडई येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २८ ऑक्टोबरला सायंकाळी सहा ते रात्री नऊच्या दरम्यान घडला.
आशा महेंद्र सरदार (वय २९, काळे कॉलनी, देहूफाटा, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी ते काळे काॅलनी, देहूफाटा येथून जात होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या हातातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरी करून नेला. चोरीची ही घटना २९ ऑक्टोबरला घडली.
सारिका जीवन बिराजदार (वय २८, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या रुममध्ये उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून ४६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीची ही घटना जय भवानी नगर, पिंपळे गुरव येथे ३० ऑक्टोबरला दुपारी पावणे एक ते सव्वाच्या दरम्यान घडली.
सोनम जयप्रकाश उपाध्याय (वय २८, रा. कुंजीर काॅलनी, पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे ३० ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपरीतील बाबा मार्केट येथे गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी १५० रुपये किंमतीची पर्स व त्यामधील ५३ हजार रुपयांची रोकड, आधारकार्ड, वाहन परवाना, असा ५३ हजार १५० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.