जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:54 IST2025-11-19T15:54:16+5:302025-11-19T15:54:47+5:30

आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे

Resignation being forced, 'IT' in crisis; Employees in the age group of 30 to 45 years are vulnerable | जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

पिंपरी : नोकरी जाण्याची सततची भीती, मध्यमवयीन कर्मचाऱ्यांवरील वाढता दबाव, सरकारी संरक्षणाचा अभाव आणि संशोधन-नवकल्पनांवरील अपुरी तजवीज या प्रमुख आव्हानांचा सामना करणारे ‘आयटी’ क्षेत्र सध्या संकटात असल्याचे चित्र आहे. पुण्यालगतच्या हिंजवडी परिसरातील आयटीयन्स सध्या या ताणतणावांना सामोरे जात आहेत.

आयटी कंपन्यांमध्ये ‘प्रकल्प संपला की कर्मचारी बाहेर’ अशी परिस्थिती आहे. प्रोजेक्टआधारित भरती आणि तातडीची कर्मचारी कपात यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी असल्याचे चित्र समोर आले आहे. अनुभवी कर्मचाऱ्यांच्या जागी कमी पगारातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याने ३० ते ४५ वर्षे वयोगट सर्वाधिक असुरक्षित ठरत आहे. अनेकांना सक्तीने राजीनामा द्यावा लागतो, तर काही जणांना नव्या नोकरीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत आहे.

कर्मचारी कपातीदरम्यान पारदर्शकता, नोकरी संपल्याची भरपाई आणि बेरोजगारी भत्ता अशा संरक्षणात्मक व्यवस्थांचा अभाव असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना कोणताही आधार मिळत नाही. काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमी तपासणीबाबत (बीजीव्ही) भीती दाखविली जात आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत असल्याची खंत आयटीयन्सकडून व्यक्त करण्यात आली.

सद्य:परिस्थितीत बहुतांश आयटी कंपन्या आउटसोर्सिंग, कॉस्ट कटिंग आणि शॉर्ट-टर्म बिलिंग मॉडेलवर चालत असल्याने एआय, सायबर सिक्युरिटी, सेमीकंडक्टर व रोबोटिक्ससारख्या क्षेत्रात मागे पडत आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी मजबूत कामगार संरक्षण कायदे, देशव्यापी कौशल्यवृद्धी मोहीम, संशोधन-नवकल्पनांना मोठा निधी आणि मध्यमवयीन कर्मचाऱ्यांसाठी दुसऱ्या करिअरच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे मतही आयटीयन्सकडून व्यक्त केले जात आहे.

देशातील एका प्रतिष्ठित आयटी कंपनीने महिला कर्मचाऱ्याच्या एकाकीपणाचा फायदा घेतला. तिला प्रसूतीरजेनंतर जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले. कंपनीचे हे कृत्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे आणि मातृत्वाच्या हक्कांचे उल्लंघन करणारे आहे. - एक आयटीयन्स.

देशातील विविध कामगार कायद्यातील तरतुदी आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही लागू आहेत. आयटी कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास त्यांनी आमच्या कार्यालयात रीतसर दाद मागावी. कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जात आहे. - निखिल वाळके, कामगार उपायुक्त

आयटी क्षेत्रातील कर्मचारी उच्चशिक्षित आहेत. परंतु, आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. - प्रशांत पंडित, सचिव, फोरम फाॅर आयटी एम्प्लाॅइज

Web Title: Resignation being forced, 'IT' in crisis; Employees in the age group of 30 to 45 years are vulnerable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.