Pimpri Chinchwad: मानवाच्या चुकांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे शहराला पूर; नदीकाठच्या भागात शिरतंय पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:30 IST2025-08-21T12:30:00+5:302025-08-21T12:30:17+5:30
पवना नदी तीरावर ११ ठिकाणी, मुळा नदीवर ८ ठिकाणी आणि इंद्रायणी नदीवर ५ ठिकाणी पाणी घुसत आहे

Pimpri Chinchwad: मानवाच्या चुकांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे शहराला पूर; नदीकाठच्या भागात शिरतंय पाणी
पिंपरी : औद्योगिक नगरीतून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांची नैसर्गिक पात्र शहरीकरण वाढल्याने आणि भराव टाकल्याने अरुंद झाली आहेत. त्यामुळे पूर आल्यानंतर शहरातील पवना नदी तीरावर ११ ठिकाणी, मुळा नदीवर आठ ठिकाणी आणि इंद्रायणी नदीवर पाच ठिकाणी पाणी घुसत आहे. मानवाच्या चुकांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे शहराला पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
पिंपरी - चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी अशा तीन नद्या वाहतात. त्यापैकी सर्वांत जास्त २४.४ किलोमीटर लांबीची पवना नदी शहराच्या मध्य भागातून वाहते. या नदीकाठच्या भागांमध्ये किवळेपासून ते दापोडीपर्यंत तसेच मुळा नदीवर वाकडपासून सांगवी, बोपखेलपर्यंत आणि इंद्रायणी नदीवर तळवडेपासून तर चऱ्होलीपर्यंत मोठ्या प्रमाणावर नदीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे पाऊस कमी पडला तरी या भागातील नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांना पूर परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे.
...ही आहेत पूर येण्याची ठिकाणे
पवना नदीवर किवळे, जाधव घाट रावेत, ताथवडे, चिंचवड केशवनगर, काळेवाडी, पिंपरी भाटनगर, संजय गांधीनगर, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, लक्ष्मीनगर येथे पुराचे पाणी शिरण्याचा धोका अधिक आहे. तसेच मुळा नदीवर वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख पंचशीलनगर, सांगवी, मुळानगर, दापोडी, बोपखेल या भागात पुराचे पाणी शिरते. इंद्रायणी नदीवर चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली या भागात पाणी शिरते.
नद्यांमधील भरावाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
पिंपरी आणि चिंचवडच्या सखल भागात नदीकाठी वस्ती ही अनेक वर्षांपासून आहे. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. पवना नदीच्या परिसरामध्ये रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी या भागांमध्ये नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकून पात्र बुजवले आहे. त्या भरावाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.
नद्यांच्या परिसरामध्ये वृक्षतोड केली जात आहे आणि नदी सुधारचा घाट घातला जात आहे. नद्यांची नैसर्गिकता कायम ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नद्यांमध्ये टाकलेल्या भरावांमुळे आता पूर परिस्थिती निर्माण होत आहे. ती निर्माण होणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. नद्यांचे पात्र अरुंद होणार नाही आणि वृक्षतोड होणार नाही, जैवविविधता नष्ट होणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. - नीलेश पिंगळे, पर्यावरणवादी
पंचवीस वर्षात शहराचे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नदीकाठच्या सखल भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत आहे. पूर्वी मोकळ्या वाटणाऱ्या नद्या आता इमारती व घरे वाढल्याने अरुंद झाल्या आहेत. यासाठी वैज्ञानिक विचार करून नद्यांचे पुनरुज्जीवन करायला हवे, नद्यांमधील साचलेला गाळ काढायला हवा.- प्रशांत शितोळे, माजी स्थायी समिती सभापती
संजयनगर परिसरामध्ये आम्ही अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहोत. जोरदार पाऊस झाल्यानंतर सखल भागामध्ये आमच्या घरांमध्ये पाणी घुसते. त्यामुळे नुकसान होते. यासंदर्भात प्रशासन, लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा.- भरत पगारे, पिंपरी