RTE Admission: 'आरटीई'च्या प्रवेशाचा गोंधळ कायम; पालकांचा महापौर लांडगे यांना घेराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:44 IST2026-04-17T09:44:16+5:302026-04-17T09:44:39+5:30
RTE Admission: आकुर्डीतील पडताळणी केंद्रातील स्थितीमध्ये सुधारणा न झाल्याने पालकांचा संताप अनावर; महापौरांकडून केंद्राची पहाणी, तातडीने सुविधांची पूर्तता करण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना

RTE Admission: 'आरटीई'च्या प्रवेशाचा गोंधळ कायम; पालकांचा महापौर लांडगे यांना घेराव
पिंपरी : मुलांच्या शाळा प्रवेशासाठी सुरू असणाऱ्या शिक्षणाचा हक्क (आरटीई) प्रक्रियेत बुधवारी झालेल्या गोंधळानंतरही आकुर्डी येथील पडताळणी केंद्रातील स्थितीमध्ये सुधारणा न झाल्याने गुरुवारी (दि. १६) पालकांचा संताप अनावर झाला. महापौर रवी लांडगे यांनी केंद्राला भेट दिली असता संतप्त पालकांनी त्यांना घेराव घालून प्रशासनाला जाब विचारला. पालकांनी विविध अडचणी मांडत तीव्र नाराजी व्यक्त केली.
भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत. पाणी, सावली, हेल्पलाइन, अपुरी कर्मचारी संख्या आणि संथ प्रक्रिया यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. यावर महापौरांनी तत्काळ दखल घेत व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अतिरिक्त संगणक, ऑपरेटर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाचनंतर प्रवेश मिळालेल्या पहिल्या १०० ते १५० पालकांना पावत्या देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दररोज सुमारे २०० अर्ज स्वीकारले जात असल्याची माहितीही देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी २० एप्रिलची अंतिम मुदत असल्याने अनेक पालक चिंतेत आहेत. प्रवेश मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता असल्याने केंद्रांवर गर्दी वाढत आहे.
‘१७ फेब्रुवारी’ नियमामुळे संभ्रम
१७ फेब्रुवारीपूर्वीचा पालकांचा रहिवासी भाडेकरार असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, हा नियम आधी सांगितला नसल्याने पालकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
राज्य शासनाकडून खुलाशाचे आदेश
आरटीई पडताळणी समितीची नियुक्ती वेळेत न झाल्याने प्रवेश प्रक्रियेत गोंधळ उडाला. पालकांनाही त्रास सहन करावा लागला. त्याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या शिक्षण विभागाला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविण्यात आली. या प्रकाराबाबत खुलासा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
कर्मचारी कमी, दुपारी तीननंतर होते कामाला सुरुवात
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कर्मचारी कमी असल्याचे कारण देत पडताळणी समितीस उशीर झाला आहे. जे कर्मचारी या कामांसाठी दिले आहेत, त्यांना दुपारी तीननंतर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे सकाळपासून रांगेत असणाऱ्या पालकांकडून फक्त अर्ज दाखल करून घेतले जातात. त्यांच्यावर दोन ते तीन दिवसांनी प्रक्रिया करण्यात येते.
१७ फेब्रुवारीचा नियम आधी सांगितला नाही. ऑनलाइन सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही पुन्हा अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात आहेत. विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. - लखन मामडे, पालक
काउंटर कमी आहेत. कागदपत्रे दिल्यानंतर पुन्हा पडताळणीसाठी येण्यास सांगितले जाते, पण नेमकी वेळ सांगितली जात नाही. - गवसपाक जमादार, पालक