Pimpari-chinchwad : तळेगाव दाभाडेसाठी दिलासा..! आंद्रा धरणातून पाणी आरक्षणास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:40 IST2026-04-17T16:39:51+5:302026-04-17T16:40:05+5:30
इंद्रायणी व पवना नदीतून काही प्रमाणात पाणी आरक्षण असले तरी, वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही अतिरिक्त मंजुरी देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

Pimpari-chinchwad : तळेगाव दाभाडेसाठी दिलासा..! आंद्रा धरणातून पाणी आरक्षणास मंजुरी
तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला आंद्रा धरण येथून घरगुती (पिण्याच्या) वापरासाठी ५.०१४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर २०४८ पर्यंतचा विचार करून घेतलेला हा निर्णय शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य देणारा ठरणार आहे. यापूर्वी इंद्रायणी व पवना नदीतून काही प्रमाणात पाणी आरक्षण असले तरी, वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही अतिरिक्त मंजुरी देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामागे आमदार सुनील शेळके यांचा पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. धरणातून पाणी आणण्याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करत शासनस्तरावर विषय लावून धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, तळेगाव शहरातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पाणी न उचलल्यास आरक्षण रद्द
शासनाने या पाणी आरक्षणास काही अटी व शर्ती लागू केल्या असून, पाणी वापरासाठी आवश्यक करारनामे, नियोजनबद्ध वितरण व्यवस्था, जलप्रदूषण नियंत्रण आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक राहणार आहे. मंजूर आरक्षणानुसार प्रत्यक्ष पाणी उचल सुरू न झाल्यास आरक्षण रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.