Pimpari-chinchwad: वायसीएम रुग्णालयातील होमिओपॅथिक, आयुर्वेदिक उपचार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:31 IST2026-04-17T16:31:07+5:302026-04-17T16:31:31+5:30

- पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणारी संस्था असल्याने इतर उपचार पद्धती सुरू करणे अशक्य : महापालिका वैद्यकीय विभागाची माहिती, गरजू रुग्णांना कमी खर्चात उपचार कसे मिळणार?

pimpari-chinchwad Homeopathic, Ayurvedic treatment at YCM Hospital closed | Pimpari-chinchwad: वायसीएम रुग्णालयातील होमिओपॅथिक, आयुर्वेदिक उपचार बंद

Pimpari-chinchwad: वायसीएम रुग्णालयातील होमिओपॅथिक, आयुर्वेदिक उपचार बंद

- रवींद्र जगधने 

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद आहेत. कोरोना काळापासून बंद झालेल्या या दोन्ही विभागांची सेवा अद्याप सुरू झालेली नाही. ‘वायसीएम’ पदव्युत्तर ॲलोपॅथी वैद्यकीय शिक्षण देणारी संस्था असल्याने येथे होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू करता येणार नाहीत, असे महापालिका वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या काळात ‘वायसीएम’ रुग्णालयात केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. इतर सर्वसामान्य रुग्णांना डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात पाठवले जात होते. त्यावेळी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक ओपीडी ही बंद करण्यात आल्या. अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत भरती झालेले बीएचएमएस डॉक्टर होमिओपॅथिक ओपीडी चालवत होते, तर काही आयुर्वेदिक डॉक्टर सेवाभावी उपचार देत होते. मात्र, कोरोनाचा कालखंड संपल्यानंतरही हे दोन्ही विभाग पुन्हा सुरू करण्यात आलेले नाहीत.

होमिओपॅथिक ‘ओपीडी’त ५० ते ७० रुग्ण

‘वायसीएम’ रुग्णालयातील होमिओपॅथिक ओपीडी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्यसेवेकडे लक्ष देत ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या या ओपीडीत नंतर रुग्ण वाढले. दररोज ५० ते ७० रुग्ण या विभागात उपचार घेत असत. होमिओपॅथिक ओपीडी चालवणाऱ्या डॉक्टर अलीकडेच निवृत्त झाल्या आहेत.

महापालिका नवीन डॉक्टर नियुक्त करणार का?

सध्या महापालिका प्रशासनाकडून या दोन्ही ओपीडी सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, रुग्ण आणि स्थानिक नागरिक नवीन होमिओपॅथिक व आयुर्वेदिक डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी करत आहेत. सेवा पुन्हा सुरू झाल्यास गरीब रुग्णांना मोफत किंवा कमी खर्चात उपचार मिळण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

इतर रुग्णालयांत काय स्थिती?

महापालिकेच्या सांगवी आणि यमुनानगर रुग्णालये वगळता इतर रुग्णालयांत आयुर्वेदिक उपचारांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे. 

‘वायसीएम’ हे ॲलोपॅथी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणारे रुग्णालय आहे. तेथे इतर पॅथीचे उपचार सुरू करता येऊ शकत नाहीत. वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या रुग्णालयांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून नियमित तपासणी होत असते.  - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Web Title : पिंपरी-चिंचवड: वायसीएम अस्पताल में होम्योपैथिक, आयुर्वेदिक उपचार बंद

Web Summary : पिंपरी-चिंचवड के वायसीएम अस्पताल ने होम्योपैथिक और आयुर्वेदिक ओपीडी सेवाएं बंद कर दी हैं, जो महामारी से बंद हैं। अधिकारियों का कहना है कि एक एलोपैथिक चिकित्सा शिक्षा संस्थान होने के कारण, वैकल्पिक उपचार संभव नहीं हैं। अस्पताल अन्य अस्पतालों में आयुर्वेदिक उपचार शुरू करने की योजना बना रहा है।

Web Title : Pimpri-Chinchwad: YCM Hospital Halts Homeopathic, Ayurvedic Treatments

Web Summary : YCM Hospital in Pimpri-Chinchwad has discontinued its homeopathic and Ayurvedic OPD services, which have been closed since the pandemic. Authorities cite that as an allopathic medical education institution, alternative treatments aren't feasible. The hospital is planning to start Ayurvedic treatments in other hospitals.