पिंपरी : पर्यावरणपूरकतेचा संदेश देत आकुर्डी येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) पहिली ‘ग्रीन बिल्डिंग’ दिमाखात उभी राहिली. मात्र, या इमारतीच्या छतावर व खुल्या जागेत बसवण्यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. या प्रकल्पातून कमी प्रमाणात वीजनिर्मिती होत असल्याने प्रशासनाला महावितरणचे लाखोंचे वीज बिल भरावे लागत आहे.
तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) आकुर्डी येथील ‘पीएमआरडीए’च्या प्रशासकीय इमारतीवर १०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा (सोलार पीव्ही) प्रकल्प कार्यान्वित केला होता. या प्रकल्पामुळे दरवर्षी वीज बिलात १५ लाख रुपयांची बचत होईल आणि दोन वर्षांत प्रकल्पाचा खर्च वसूल होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत या सौर प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती ‘शून्य’ असल्याचे बिलावर दाखवण्यात आले आहे.
सौर प्रकल्प जुना झाल्याने त्यातून क्षमतेच्या शंभर टक्के वीजनिर्मिती होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या इमारतीमध्ये वीज वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इमारतीची भिस्त आता ‘महावितरण’वर आहे. फेब्रुवारीत ‘पीएमआरडीए’ला दोन लाख ७६ हजार ४७० रुपयांचे वीज बिल आले आहे. विशेष म्हणजे, जानेवारीतही १३ हजारांहून अधिक रुपयांची थकबाकी आणि चालू वापराचे मिळून मोठे बिल भरावे लागले होते. सौर ऊर्जानिर्मिती अत्यल्प होत असल्याने सवलती मिळण्याऐवजी प्रशासनाला ‘डिमांड चार्जेस’ आणि इतर शुल्कांचा मोठा फटका बसत आहे.
या इमारतीसाठी उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पाचा निव्वळ खर्च १.२७ कोटी रुपये होता. आराखड्यात वार्षिक १५ लाखांची बचत आणि ट्रान्सफर लॉसेसमध्ये कपात होईल, असे नमूद केले होते. ‘नेट मीटरिंग’प्रणालीद्वारे ही वीज मुख्य ग्रीडमध्ये जाणे अपेक्षित आहे. मात्र, देखभाल-दुरुस्तीचा अभाव, सौर पॅनल आणि इतर साहित्य तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य होणे, प्रकल्प अद्ययावत न करणे, अशा कारणांनी पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत नाही. सततच्या तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकल्प खर्चिक झाला आहे. त्यामुळे प्रशासनासाठी पांढरा हत्ती ठरत आहे.
---
थोडक्यात आकडेवारी :
-सौर प्रकल्पाची क्षमता : १०० किलोवॅट
-फेब्रुवारीचे वीज बिल : २,७६,४७० रुपये
-सौर ऊर्जानिर्मिती : ० (शून्य) युनिट्स
-वीज वापर : २१,६२० युनिट्स
---
सौर प्रकल्पातून वीजनिर्मिती होत आहे. मात्र, इमारतीमधील विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे महावितरणकडूनही वीज घ्यावी लागत आहे. सौर प्रकल्प अद्ययावत करण्यात येणार आहे. - प्रशांत सावंत, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग, पीएमआरडीए
Web Summary : PMRDA's solar project at Akurdi faces criticism. Despite initial claims of savings, the project yields negligible energy. High electricity consumption forces reliance on Mahavitran, resulting in hefty bills and questioning the project's viability.
Web Summary : अकूर्दी में पीएमआरडीए का सौर ऊर्जा प्रोजेक्ट आलोचना का सामना कर रहा है। बचत के शुरुआती दावों के बावजूद, परियोजना से नगण्य ऊर्जा प्राप्त होती है। उच्च बिजली खपत के कारण महावितरण पर निर्भरता, भारी बिलों में परिणत हुई, परियोजना की व्यवहार्यता पर सवाल।