वडिलांसमोरच मुलीचा दुर्दैवी अंत; डंपरच्या धडकेत चाकाखाली येऊन युवतीचा मृत्यू, हिंजवडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:17 IST2025-11-18T14:17:38+5:302025-11-18T14:17:54+5:30
तरुणी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती, तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.

वडिलांसमोरच मुलीचा दुर्दैवी अंत; डंपरच्या धडकेत चाकाखाली येऊन युवतीचा मृत्यू, हिंजवडीतील घटना
हिंजवडी: ‘पीक अवर’ला बंदी आणि कारवाई आणि रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती करून आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी (दि.१७) दुपारी डम्परच्या धडकेत चाकाखाली चिरडल्याने हिंजवडीतील युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. फ्लॅट नं. ०४, मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्ता, हिंजवडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. डंपरचालक अजय अंकुश ढाकणे (वय २०, रा. जांबे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तन्वी वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच- १४, केव्ही- ३८८३) जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून मारुंजीच्या दिशेला जात होती. यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरच्या धडकेत (एमएच- १४, एचयू- ९८५५) चाकाखाली येऊन तन्वी हिचा मृत्यू झाला. अपघातात तिचे वडील जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. साखरे हे हिंजवडी येथील स्थानिक रहिवासी असल्याने अपघाताची बातमी समजताच ग्रामस्थांनी ती राहत असलेल्या परिसरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, आयटी परिसरात होणारी दगड, खडी, माती, डबर त्याचबरोबर सिमेंट रेडीमिक्सची वाहतूक सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशा अवजड वाहनांचा भरघाव वेग आणि खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था अपघातांना कारणीभूत ठरत आहे. अपघातांच्या घटनेनंतर नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन, मार्च काढून वाहतूक सुरक्षेचा आणि प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे. तरीही, अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबत नसल्याने आता, रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील खराब रस्ते अपघातांना कारणीभूत !
प्रामुख्याने अवजड वाहनांमधून रस्त्यावर पडणारी खडी, वाळू आणि डबरमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. त्यात, आयटी परिसरातील काही रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली भयानक दुरवस्था आणि सुसाट धावणारी अवजड वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
घरच्यांचा आक्रोश आणि ग्रामस्थ हळहळले !
अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावठाण रस्ता आणि साखरे कुटुंब राहत असलेल्या परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली. स्मशानभूमीत आपल्या लेकीच्या अंत्यसंस्कारावेळी बहीण आणि आई-वडिलांनी टाहो फोडला. आई आणि बहिणीचा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थसुद्धा हळहळले. सर्वांचे डोळे पाणावले.