पिंपरीत मोरवाडी येथील बंद माॅलला आग; सुदैवीने जिवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 20:28 IST2025-12-23T20:27:57+5:302025-12-23T20:28:13+5:30
मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाहेरील बाजूस असलेल्या जाहिरात फलकाला लागलेल्या आगीत नुतनीकरणासाठी उभारलेले बांबूचे मचान जळून खाक झाले

पिंपरीत मोरवाडी येथील बंद माॅलला आग; सुदैवीने जिवितहानी नाही
पिंपरी : पिंपरीतील मोरवाडी परिसरात पुणे–मुंबई महामार्गालगत असलेल्या बंद सिटी वन मॉलच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाहेरील बाजूस असलेल्या जाहिरात फलकाला लागलेल्या आगीत नुतनीकरणासाठी उभारलेले बांबूचे मचान जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन कार्यालयाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉल बंद असल्याने त्याठिकाणी नुतनीकरणाचे काम सुरू होते. मंगळवारी सायंकाळी अचानक जाहिरात फलकाला आग लागून काही क्षणात आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे फलकासह बाहेरील बाजूस उभारलेले बांबूचे मचान आगीत जळून खाली कोसळले.
आगीची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारी म्हणून प्राधिकरण, चिखली आणि नेहरूनगर येथील अग्निशमन दलाची वाहनेही घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.