Pimpri Chinchwad: प्राधिकरणात चेंबरमध्ये उतरले; विषारी वायूमुळे ३ जणांचा गुदमरून मृत्यू, परिसरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:51 IST2025-08-15T16:51:02+5:302025-08-15T16:51:17+5:30
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस साजरा होत असताना दुसरीकडे प्राधिकरणात गटारी मधील विषारी वायुने तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला

Pimpri Chinchwad: प्राधिकरणात चेंबरमध्ये उतरले; विषारी वायूमुळे ३ जणांचा गुदमरून मृत्यू, परिसरात हळहळ
पिंपरी: एका दूरसंचार कंपनीच्या वायरचे काम करण्यासाठी गटारी मध्ये तिघेजण उतरले. विषारी वायूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी प्राधिकरणातील भेळ चौकात घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्राधिकरणातील भेळ चौकात अ प्रभाग कार्यालयाच्यासमोर समोरील रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी आहे. नागरिकांची तक्रार आल्याने दुपारच्या सुमारास एका दूरसंचार कंपनीच्या वायरच्या संदर्भात काम करण्यासाठी चार जण कर्मचारी येथे आले. त्यांची वायर ही मलनिस्सारण वाहिनीच्या जवळून जात होती. मल निसरण वाहिनीचे झाकण उघडून त्यामुळे एकेक करून तीन जण आतमध्ये उतरले. तर एक जण बाहेरच होता. बराच वेळ झाल्यानंतरही आतून प्रतिसाद येत नसल्याने चौथ्या कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक आले. अग्निशामक दलाच्या पथकास पाचरण करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाने मलिनिसरण वाहिनीमधील तिघा जणांना बाहेर काढले. ते बेशुद्ध असल्याने त्यांना तातडीने जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
असा सा झाला उलगडा?
मल:निसारण वाहिनीमध्ये उतरलेले कर्मचारी हे आरोग्य विभागाचे असावेत, मात्र प्रत्यक्ष दर्शनी चौकशी केल्यानंतर हे कर्मचारी एका दूरसंचार कंपनीचे असल्याचे समजले. मृतांची नावे पूर्णपणे समजली नसून वाचलेल्या चौथ्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाचे नाव दत्ता, दुसऱ्याचं नाव रावसाहेब आणि तिसऱ्याच नाव लखन अशोक धीवर (वय ३२, बिजलीनगर) असे आहे. मलनिस्सारण वाहिनीमध्ये जाऊन ही तिघेजण काय करत होते, याबाबत ठोस माहिती मिळाली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्राधिकरणात हळहळ
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस साजरा होत असताना दुसरीकडे प्राधिकरणात गटारी मधील विषारी वायुने तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर वृत्त पसरले आणि गर्दी जमली
"चेंबरमध्ये तिघांचा मृत्यू" बातमी सोशल मीडियावर पसरली आणि प्राधिकरणातील घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. महापालिकेच्या आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष सागर चरण हेही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी केली. त्यावेळी संबंधित कर्मचारी हे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नव्हते तर ते एका दूरसंचार कंपनीचे होते अशी माहिती पुढे आली.
सागर चरण म्हणाले, "आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असतात. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर मदत कार्य करण्यासाठी आम्ही तातडीने आलो. त्यावेळेस तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. हे कर्मचारी महापालिका आरोग्य विभागाचे नाहीत. तर एका दूरसंचार कंपनीचे आहेत. ते वायरचे काम करण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळाली आहे. चेंबर मध्ये तिघांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. "