अंगणवाडीताई अजूनही मानधनावरच; त्यांच्या ५० वर्षांच्या सेवेला आता तरी न्याय द्या, बाबा आढावांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:27 IST2025-10-03T12:27:19+5:302025-10-03T12:27:51+5:30
अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनिसांनी मानवी विकासाच्या सर्वांगीण विषयात प्रामाणिकपणे, प्रभावी काम केले.

अंगणवाडीताई अजूनही मानधनावरच; त्यांच्या ५० वर्षांच्या सेवेला आता तरी न्याय द्या, बाबा आढावांची मागणी
पिंपरी : दुबळ्या घटकातील मुलांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या, बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या अंगणवाडीला आता ५० वर्षे पूर्ण झाली. मात्र, ती चालवणारी अंगणवाडीताई अजूनही मानधनावरच आहे. सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या अंगणवाडीताईला आता तरी न्याय द्या, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी शासनाकडे केली.
अंगणवाडीला महात्मा गांधी जयंती दिवशी ५० वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त अंगणवाडी कर्मचारी सभा आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना पिंपरी पूर्वच्या वतीने बुधवारी (दि.१) चिंचवड येथे अंगणवाडीच्या ५१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला व बालविकास उपायुक्त संजय माने होते. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद संपत, हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे आदी उपस्थित होते.
नितीन पवार म्हणाले, अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनिसांनी मानवी विकासाच्या सर्वांगीण विषयात प्रामाणिकपणे, प्रभावी काम केले.
ज्येष्ठ अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचा डॉ. आढाव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये लता वाळके, मीनाक्षी शिंदेकर, सुनीता कांडगे, मोहिनी सोनपाटकी, रजनी बायस्कर, तारा रोकडे, मंगल घुले, सुमन पाटील, नंदा भालेराव, मीनल भालेराव, संजीवनी नेवाळे, मंगला पाटील तसेच मुख्य सेविका महानंदा जायभाय, दीपा शितोळे, अर्चना राहीनज, अस्मिता गावडे, पद्मजा काळे यांचा समावेश होता. सेवानिवृत्त शशिकला पंडित, रिक्षा पंचायतीचे अशोक मिरगे, काशिनाथ शेलार, पथारी संघटनेचे शैलेश गाडे, महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे ओंकार मोरे यांनाही गौरवण्यात आले.
नेत्र तपासणीसह मोफत चष्मे वाटप
यावेळी ३०० अंगणवाडी सेविका, मदतनिसांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील दीडशे जणींना जतन फाउंडेशनच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे.