पवनाधरण परिसरात एक युवक बुडाला; शोधकार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 17:54 IST2023-04-23T17:53:59+5:302023-04-23T17:54:11+5:30
पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेल्या १८ जणांपैकी एकजण पाण्यात बुडाला

पवनाधरण परिसरात एक युवक बुडाला; शोधकार्य सुरु
पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या परिसरात मुंबई येथून (दि.२२) रोजी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक बुडाला. पवनाधरणाच्या पाण्यात उतरलेल्या १८ जणांपैकी एक पाण्यात बुडला ही घटना (दि. २३) रोजी दुपारी ०२.०० वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरातील फांगणे गावाच्या हद्दीत येथे घडली आहे.पाण्यात बुडलेल्या युवकांचे नाव साहिल विजय सावंत (वय १८)असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना धरण परिसरात मुंबई परेळ येथील एका कॉलनी मधील नऊ युवक आणि नऊ युवती असे एकूण अठरा जण फिरण्यासाठी पवनाधरण परिसरात आले होते.हे सर्वजण पाण्यात उतरले होते. यावेळी पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेल्या १८ जणांपैकी एकजण पाण्यात बुडाला. हे लक्षात येताच बाहेर असलेल्या युवक व युवतीनी आरडाओरडा केला.
त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत पोलिसांना संपर्क केला. सदर घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस देखील अवघ्या काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हवालदार संतोष शेळके,हवालदार नितीन कदम, होमगार्ड भिमराव वाळुंज, श्रीकांत घरदाळे व शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य हे शोध घेत आहे.