डंपरने नववीच्या विद्यार्थ्याला चिरडलं अन् एका क्षणात त्याच आयुष्य संपलं; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:20 IST2026-03-12T16:18:30+5:302026-03-12T16:20:53+5:30
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून वाहतूक नियमांचे पालन आणि अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणीही जोर धरत आहे

डंपरने नववीच्या विद्यार्थ्याला चिरडलं अन् एका क्षणात त्याच आयुष्य संपलं; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातून एक अतिशय धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. आरएमसी ट्रक म्हणजेच डंपरने एका १४ वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संतापजनक दृश्य पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रेम लोक पार्क परिसरात, आकुर्डीहून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. दुपारी साडेबाराच्या सुमारास सायकलवरून जाणाऱ्या एका शाळकरी मुलाला आरएमसी ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात फारुक शकील तांबोळी या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रक चालकासह ट्रकलाही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून, त्यातील दृश्य अत्यंत धक्कादायक आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून वाहतूक नियमांचे पालन आणि अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणीही जोर धरत आहे. एका निष्पाप शाळकरी मुलाचा अशा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.