Pimpri Chinchwad: १२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:50 IST2025-10-03T13:49:31+5:302025-10-03T13:50:08+5:30
Pimpri Chinchwad Lift Accident: अग्निशमन दलाचे जवान पोहचले, त्यांनी कटरच्या साह्याने मुलाची यातून सुटका केली. पण उशीर झाला होता

Pimpri Chinchwad: १२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना
Pimpri Chinchwad Lift Accident: पिंपरी चिंचवड शहरातील चौवीसवाडी येथील राम स्मृती सोसायटीत गुरुवारी संध्याकाळी दुर्दैवी घटना घडली. लिफ्टचा दरवाजा न उघडल्याने एका १२ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. लिफ्ट दरवाजाच्या लोखंडी पट्टयात पाय अडकल्याने लिफ्ट अडकून राहिली. काही वेळाने अग्निशमन दल त्याठिकाणी पोहोचल्यावर त्याला बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेत १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम स्मृती सोसायटीच्या इमारतीतील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या हि घटना घडली आहे. 12 वर्षीय मुलगा लिफ्टमधून वरच्या मजल्यावर निघाला. ४ मजली इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती. त्या दारामध्ये असणाऱ्या लोखंडी पट्ट्यातून खेळता-खेळता मुलाचे पाय बाहेर आले. यामुळं लिफ्ट दोन मजल्यांच्या मधोमध अडकली. त्याचे पाय अडकल्याने सुटका करुन घेण्यासाठी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून उपस्थितांनी आई-वडिलांना बोलावले. मुलाची यातून सुटका करण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु झाले. काहीवेळाने अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान पोहचले, त्यांनी कटरच्या साह्याने मुलाची यातून सुटका केली. पण उशीर झाला होता, रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या दुर्घटनेनंतर चौवीसवाडी परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यामुळे सोसायटीतील रहिवाशी संतप्त झाले असून लिफ्टच्या देखभालीत झालेल्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.