लँडिंग आणि टेक-ऑफ: विमानासाठी सर्वात कठीण टप्पे, यावेळी असतो अपघाताचा सर्वाधिक धोका; असं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:47 IST2026-01-28T14:40:55+5:302026-01-28T14:47:27+5:30
बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली.

या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विमान कंपनी VSR ने देखील लँडिंग दरम्यान धावपट्टीच्या अगदी जवळ झालेल्या अपघाताबाबत एक निवेदन जारी केले आहे. कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा असा कंपनीचा संशय आहे. आगामी काळात याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळेलच.

गेल्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानेही देश हादरला होता. या दुर्घटनेत २४१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक दिवस त्या विमानातील प्रवासी, त्यांचे शेवटचे फोटो, पोस्ट याबद्दल चर्चा सुरु होती.

मात्र, प्रश्न असा पडतो, की एवढी चोख व्यवस्था असूनही अचानक विमान बिघाड होऊन अपघात होण्यामागे नेमकी काय कारणे असू शकतात याचा तांत्रिकदृष्ट्या आढावा घेऊ.

१. उंची आणि वेगाचा अभाव
जेव्हा विमान हवेत उंच असते (Cruising altitude), तेव्हा वैमानिकाकडे कोणत्याही तांत्रिक बिघाडावर मात करण्यासाठी पुरेसा वेळ आणि उंची उपलब्ध असते. मात्र, टेक-ऑफ किंवा लँडिंगवेळी विमान जमिनीच्या खूप जवळ असते. जर काही बिघाड झाला, तर तो सुधारण्यासाठी वैमानिकाकडे केवळ काही सेकंद असतात.

२. मानवी चूक (Human Error)
या दोन्ही प्रक्रियांदरम्यान वैमानिकाला अत्यंत कमी वेळात अनेक निर्णय घ्यावे लागतात. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी बोलणे, विमानाचा वेग नियंत्रित करणे आणि धावपट्टीचा अंदाज घेणे या गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतात. अशा दबावाखाली छोटीशी चूकही मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.

३. हवामानाचा प्रभाव
जोराचा वारा, पाऊस, धुके किंवा 'विंड शियर' (वाऱ्याच्या दिशेत अचानक होणारा बदल) यांचा सर्वाधिक फटका लँडिंगच्या वेळी बसतो. जमिनीच्या जवळ असल्यामुळे वाऱ्याच्या झोतामुळे विमानाचे संतुलन बिघडण्याची शक्यता जास्त असते.

४. तांत्रिक गुंतागुंत
टेक-ऑफ: विमानाची इंजिने त्यांच्या पूर्ण क्षमतेने चालत असतात, ज्यामुळे इंजिनवर सर्वाधिक ताण असतो. विमानाचे 'लँडिंग गियर', फ्लॅप्स आणि ब्रेक यांसारख्या अनेक हलणाऱ्या भागांचा वापर होतो. यात बिघाड झाल्यास लँडिंग कठीण होते.

५. धावपट्टीवरील अडथळे
कधीकधी धावपट्टीवर दुसरे विमान येणे किंवा पक्षी विमानाला धडकणे (Bird Strike) यांसारख्या घटना टेक-ऑफच्या वेळी अधिक घडतात. क्षुल्लक वाटणारे हे कारणदेखील अनेकांच्या जीवावर बेतू शकते.

विमान अपघाताची टक्केवारी :
टेक-ऑफ म्हणजेच सुरुवातीच्या चढावात सुमारे १४% अपघात होतात तर लँडिंग अर्थात शेवटच्या टप्प्यात सुमारे ४९% अपघात. याउलट, विमान जेव्हा आकाशात स्थिर असते, तेव्हा अपघाताची शक्यता सर्वात कमी असते.

















