Chandrayaan 3 : सर्व यंत्रणा फेल झाली तरी विक्रम लँडर चंद्रावर कसे उतरेल? ISRO ने दिली महत्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:30 PM2023-08-09T12:30:23+5:302023-08-09T12:38:40+5:30

Chandrayaan 3 : चंद्रयान-3 मोहिमेने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

इस्त्रोने चंद्रयान 3 श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण केले. आता चंद्रयान- 3 चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे, आता हे सर्व यशस्वी झाले तर विक्रम लँडर २३ ऑगस्ट रोजी दक्षिण ध्रुवावर लँडिंग करेल, पण येथे प्रश्न देखील आहे की यंत्रणेत काही बिघाड झाला तर काय होईल. आता या प्रश्नावर स्वत: इस्त्रोने अपडेट दिली आहे.

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. "समजा जर सेन्सरमध्ये बिघाड झाला असेल किंवा दोन इंजिनमध्ये बिघाड झाला असेल तर अशावेळी विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करेल.

"जर प्रोपल्शनमध्ये कोणताही दोष नसेल. विक्रम लँडरची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की सॉफ्ट लँडिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

एस सोमनाथ हे चंद्रयान-3 इंडिया प्राइड स्पेस मिशनची माहिती देत ​​होते. पुढं बोलताना ते म्हणाले की, त्रुटीची शक्यता खूपच कमी आहे.प्रोपल्शन सिस्टीममध्ये दोष नसल्यास सॉफ्ट लँडिंगमध्ये कोणतीही अडचण नाही.

चंद्रयान-3 मिशन लाँच व्हेइकल मार्क-3 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आले. सध्या चंद्रयान-3 १७०x४३१३ लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. ९ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी, चंद्रयान दुसर्‍या युक्तीद्वारे १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत आणले जाईल.

चंद्रयान-3 चा आतापर्यंतचा प्रवास उत्साहवर्धक आहे. चंद्रयान-3 जेव्हा चंद्रापासून १०० किमी अंतरावर राहील, तो क्षण खूप महत्त्वाचा आहे.

इस्रो प्रमुख म्हणाले की, चंद्रापासून १०० किमी अंतर ही कोणत्याही प्रकारची समस्या नाही. लँडरच्या स्थितीचा आपण किती अचूक अंदाज लावतो हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

"हे गृहितक फार महत्वाचे आहे. याला आपण कक्षा ठरवण्याची प्रक्रिया म्हणतो. हे योग्य प्रकारे केले तर पुढील प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.

यावेळी आपण चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-3 यशस्वीपणे उतरविण्यात सक्षम होऊ. आताच्या प्रक्रियेनुसार कक्षेतील बदल यशस्वीपणे केले जात आहेत.

चंद्रयान-3 हे दोन आठवडे प्रयोग चालवण्यासाठी डिझाइन केले आहे, तर लुना-25 चंद्रावर वर्षभर काम करेल. १.८ टन वजन आणि ३१ किलोग्रॅम वैज्ञानिक उपकरणे घेऊन, Luna-25 १५ सेमीने गोठलेल्या पाण्याच्या उपस्थितीची चाचणी घेणार.

६ इंच खोलीतून खडकाचे नमुने घेण्यासाठी स्कूप वापरेल. ज्यामुळे चंद्रावर मानवी जीवन शक्य होऊ शकते. ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रक्षेपित होणार्‍या लुना-25 मोहिमेला जवळपास दोन वर्षे विलंब झाला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने त्यांचा पायलट-डी नेव्हिगेशन कॅमेरा लुना-25 ला जोडून त्याची चाचणी घेण्याची योजना आखली होती. मात्र गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर याचे काम लांबणीवर पडले.