मुलांची स्मरणशक्ती- एकाग्रता वाढवण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ४ उपाय, शरीरही होईल बलवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2025 17:31 IST2025-12-06T09:38:17+5:302025-12-06T17:31:31+5:30

मुलं एकाजागी बसून शांत चित्ताने अभ्यास करतच नाहीत अशी अनेक पालकांची तक्रार असते. मुलांची एकाग्रता नसेल तर त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि मग पर्यायाने परीक्षेतल्या गुणांवर होतो.

म्हणूनच पुढे सांगितलेले प्राणायाम किंवा योगासनं मुलांकडून नियमितपणे करून घेतले तर त्याचा उपयोग मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढण्यासाठी होऊ शकतो, असं रामदेव बाबा सांगतात.

त्यापैकी त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे भ्रस्त्रिका प्राणायाम. हे प्राणायाम दररोज काही मिनिटांसाठी नियमितपणे केल्यास शरीरातील ऑक्सिजन वाढते. त्यामुळे अंगातून आळस, सुस्ती कमी होते आणि कोणत्याही कामात लक्ष लागते.

दुसरे प्राणायाम आहे अनुलोम विलोम. मन शांत ठेवून मानसिक संतुलन उत्तम राहण्यासाठी हे प्राणायाम खूप उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

भ्रामरी प्राणायाम करणेही मुलांसाठी खूप गरजेचे आहे. यामुळे मन शांत राहून एकाग्रता वाढण्यास मदत होते. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून रोज सर्वांगासनही करून घ्यावे. यामुळे डोक्याच्या भागात चांगला रक्तप्रवाह होतो. परिणामी झोप शांत होते, मेंदू ॲक्टीव्ह राहण्यास मदत होते.

सर्वांगासनप्रमाणेच शिर्षासन करणेही खूप फायद्याचे ठरते. या सगळ्या गोष्टींसोबतच मुलांचा आहार उत्तम ठेवणे, स्क्रिन टाईम कमी करणे, त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य देणे या गोष्टीही खूप महत्त्वाच्या ठरतात.

















