Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:30 IST2025-07-03T12:45:13+5:302025-07-03T13:30:08+5:30

Chaturmas 2025: ६ जुलै रोजी आषाढी एकादशीपासून(Ashadhi Ekadashi 2025) ते ते कार्तिकी एकादशी(Kartiki Ekadashi 2025) हा काळ चतुर्मास(Chaturmas 2025) म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक भाविक अध्यात्मिक उन्नतीसाठी वेगवेगळे संकल्प करतात. जसे की ग्रंथवाचन, स्तोत्रपठण, हरिकीर्तन, एकवेळ भोजन इ. परंतु आपले मानसिक स्वास्थ्य नीट नसेल तर अध्यात्मिक गोडी कशी लागणार? यासाठी आपण मानसिक पातळीवर काही संकल्प करू शकतो.

चार महिने सातत्याने आपण जर संकल्प पूर्ण केला तर हा काळ आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकेल. उदाहरणादाखल काही संकल्प देत आहे, त्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्राधान्य क्रम लक्षात घेऊन बदल करू शकता.

हा संकल्प अत्यंत कठीण आहे, पण पार पाडला तर आयुष्यभर कामी येणारा आहे. रागावर नियंत्रण मिळवणे सर्वात कठीण. परंतु या रागानेच आपण आपले नुकसान करून घेतो. मग घर असो वा ऑफिस रागवायचे नाही हा संकल्प सोडला तर मनावर नियंत्रण मिळवता येईल आणि आयुष्यभराची सवय जडेल. यासाठी करायचे एवढेच, राग आला की क्षणभर मनात सात वेळा म्हणायचे संकल्प....! राग निवळेल आणि संकल्पाला बळ मिळेल.

वेळ नाही अशी सबब देऊन आपण व्यायाम टाळतो. जर आपण सोशल मीडियासाठी दिवसातले एक दोन तास खर्च करू शकत असू तर व्यायामासाठी १५ मिनिटे का काढू शकत नाही? अशी स्वतःला विचारणा करा आणि सोयीची वेळ निवडून किमान १५ मिनिटं व्यायाम करा. योगाभ्यास, डान्स, दोरीच्या उड्या, खेळ असा कोणताही प्रकार निवडा, ज्यामुळे छान घाम निघू शकेल आणि उत्साही वाटेल. चार महिने हा उपक्रम करा आणि तना-मनात घडलेला फरक बघा!

दिवसातला काही वेळ जर आपण स्वतःसाठी देत नसू तर आपण उत्तम संवादाला मुकत आहोत असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हे कळत असूनही आपण वळवत नाही. यासाठी सकाळी उठल्यावर पाच मिनिटं आणि झोपण्यापूर्वी पाच मिनिटं स्वतःसाठी ठेवा. स्वतःच्या आत डोकावून बघा. जे विचार येतील ते येउद्या. पण शांत बसून डोक्यात चालणाऱ्या घडामोडींचा आढावा घ्या. यातूनच सरावाने एक दिवस तुम्हाला शांत चित्ताची अनुभूती होईल!

सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपण दिवसाचा बराच वेळ वाया घालवतो. डोळ्यांना त्रास तर होतोच, शिवाय डोक्यावर ताण येतो. वेळ वाया जातो ही बाब वेगळी. यासाठी चार महिने आपण सोशल मीडियाचा एकवेळ उपास करू शकतो. अर्थात जसे चतुर्मासात एकवेळ जेवतात तशी सोशल मीडिया वापराची वेळ ठरवून घ्यायची आणि तेवढ्याच वेळेत फोन वापरायचा. यामुळे वाचणारा वेळ आपण आपल्या छंदांसाठी, घरच्यांसाठी किंवा नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी देऊ शकतो.

चतुर्मासात पचन शक्ती मंदावते म्हणून धर्मशास्त्राने विविध उपास सांगितले आहेत. परंतु येता जाता अरबट-चरबट खाण्याची सवय असणाऱ्यांना एकएक उपास करणं अवघड वाटेल. यासाठी खाण्यावर नियंत्रण राखणे हा पर्याय निवडता येऊ शकतो. दिवसातून तीनदा चहा घेणाऱ्यांनी दोनदा, चारदा जेवणाऱ्यांनी तीनदा, तीन पोळ्या खाणाऱ्यांनी दोन पोळ्या, बाहेरचे खाणाऱ्यांनी घरचे जेवण असे सुयोग्य बदल करून आपण भूक न मारता आरोग्यदायी सवयींनी नियंत्रण आणू शकतो. त्यामुळे तब्येत सुधारेल आणि उत्साही वाटेल. याव्यतिरिक्त तुमच्या डोक्यात काय संकल्प आहेत ते कागदावर उतरवा आणि त्याची सुरुवात आषाढीच्या मुहूर्तावर करा. या बदलांमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व बदलेल आणि नशीबही!

याव्यतिरिक्त तुमच्या डोक्यात काय संकल्प आहेत ते कागदावर उतरवा आणि त्याची सुरुवात आषाढीच्या मुहूर्तावर करा. या बदलांमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व बदलेल आणि नशीबही!